क्यूएस रँकिंगमध्ये आयआयटी मुंबईचा दबदबा कायम pudhari photo
मुंबई

QS Ranking IIT Bombay : क्यूएस रँकिंगमध्ये आयआयटी मुंबईचा दबदबा कायम

देशातील सहा प्रमुख संस्था जगातील पहिल्या 50मध्ये

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : जागतिक उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‌‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स बाय सब्जेक्ट‌’मध्ये यंदाही भारतीय संस्थांची दमदार कामगिरी नोंदवली गेली असून, आयआयटी मुंबईने आपला दबदबा कायम ठेवला आहे. विषयानुरूप क्रमवारीत देशातील सहा प्रमुख संस्थांनी जगातील पहिल्या 50मध्ये स्थान मिळवत भारतीय शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे.

या यादीत चार भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी (बिट्स पिलानी) यांचा समावेश आहे.

लंडनस्थित क्यूएस क्वाकरेल्ली सायमंड्स या संस्थेकडून दरवर्षी जगभरातील विद्यापीठांचे मूल्यमापन केले जाते. यंदाच्या क्रमवारीत 100हून अधिक देशांतील सुमारे 1900 विद्यापीठांमधील 21 हजारांहून अधिक अभ्यासक्रमांचे 55 विषय आणि पाच व्यापक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये मूल्यांकन करण्यात आले.

या यशामध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी मद्रास यांचा मोठा वाटा असून, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे. आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबई यांनी प्रत्येकी सहा विषयांमध्ये पहिल्या 50मध्ये स्थान मिळवत सर्वाधिक व्यापक कामगिरी नोंदवली आहे.

विशेषतः केमिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रथमच टॉप 50 मध्ये प्रवेश, तसेच इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि एकूण अभियांत्रिकी-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आयआयटी दिल्लीने आपली छाप पाडली आहे.

दरम्यान, भारताची प्रगती केवळ संख्येत वाढ म्हणून नव्हे, तर गुणवत्तेतील झेप म्हणून महत्त्वाची असल्याचे क्यूएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेसिका टर्नर यांनी नमूद केले.

  • व्यवस्थापन शिक्षणातही देशातील संस्थानी ठसा उमटवला आहे. आयआयएम अहमदाबादने बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि मार्केटिंग या दोन्ही विषयांत 21वे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, मार्केटिंग विषयात भारताचा हा पहिलाच उल्लेखनीय प्रवेश ठरला आहे. याशिवाय, इंडियन स्कूल ऑफ माइन्स (आयएसएम) धनबादने खनिजे व खनिकर्म अभियांत्रिकीमध्ये 21वे स्थान मिळवत जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT