Crime Against Children Pudhari
मुंबई

Pydhonie Crime: मुंबईत सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, पायधुनीत सुरक्षा रक्षक अटकेत; नागरिकांची निदर्शने

Mumbai Todays News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित सुरक्षा रक्षकाला (वॉचमन) अटक केली असून त्याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, प्रकरणातील पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.

घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक पायधुनी पोलिस ठाण्यासमोर जमले. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत काही नागरिकांनी निदर्शने केली. या दरम्यान काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

परिस्थिती लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात शांतता असून कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास पायधुनी पोलीस करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT