पवन होन्याळकर : मुंबई
राज्यातील विविध विद्यापीठांअंतर्गत अभियांत्रिकी पदवी (बीई/बीटेक) अभ्यासक्रमासाठी झालेल्या प्रवेश प्रक्रियेत यंदा सर्वाधिक प्रवेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाले आहेत.या विद्यापीठाच्या अंतर्गत ७० हजार ४२० जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी तब्बल ६० हजार ४८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ असून या विद्यापीठात ४३ हजार ५०९ जागांपैकी २९ हजार ९९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला.त्यानंतर मुंबई विद्यापीठाने तिसरे स्थान पटकावले असून, तेथील महाविद्यालयांत १५ हजार ९५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील १५ विद्यापीठांतर्गत एकूण २ लाख २ हजार ८८३ जागा उपलब्ध होत्या. यापैकी १ लाख ६६ हजार ७४६ जागा भरल्या गेल्या आहेत. एकूण प्रवेशात केवळ पुणे, लोणेरे आणि मुंबई विद्यापीठांचा वाटा ६४ टक्क्यांहून अधिक आहे.
विदर्भातील नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने ८ हजार ८५५ (५.३ टक्के) प्रवेश नोंदवले, तर अमरावती विद्यापीठात ९ हजार २०४ (५.५ टक्के)विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ८ हजार ८५५ (५.३ टक्के) प्रवेश झाले. सोलापूर विद्यापीठात ३ हजार १०८ (१.८ टक्के), छ.संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २ हजार ४०१ (१.४ टक्के), तर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात केवळ ६९९ (०.४ टक्के) प्रवेश झाले.
जळगाव विद्यापीठात २ हजार २९८ (१.३ टक्के) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. याशिवाय युनिटरी पब्लिक युनिव्हर्सिटी (१ हजार ५४९ - ०.९ टक्के), वारणा विद्यापीठ (१ हजार १७८ - ०.७ टक्के), एसएनडीटी महिला विद्यापीठ (३९५ - ०.२ टक्के), गोंडवाना विद्यापीठ (३६१ - ०.२ टक्के) तसेच आयसीटी कॅम्पस (३१० - ०.२ टक्के) यांचीही नोंद झाली आहे.
प्रदेशनिहाय पाहता, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ५०.६ टक्के प्रवेश झाले आहेत. कोकण विभागाचा वाटा ३२.६ टक्के, विदर्भाचा १२.६ टक्के तर मराठवाड्यात केवळ २.३ टक्के प्रवेश नोंदवले गेले. उत्तर महाराष्ट्राचा वाटा १.६ टक्के असून, एसएनडीटी महिला विद्यापीठामुळे 'मुंबई/राज्यव्यापी' श्रेणीत ०.३ टक्के प्रवेश झाले आहेत.