मुंबई

Phulewada development: पुण्यातील महात्मा फुले स्मारकासाठी २३० कोटी मंजूर; देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार संपूर्ण सुशोभीकरण

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त परिसराचा विकास; भिडेवाडा स्मारकाचे काम तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी २३० कोटी रुपयांच्या विकास प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनुसार या योजनेअंतर्गत फुलेवाडा परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच आवश्यक जमीन संपादन करून संपूर्ण परिसराचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या समितीच्या बैठकीनंतर दिली.

यानिमित्त बहुजन आणि इतर मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय जाहीर केलेे. ऐतिहासिक भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेचे स्मारक उभारणीचे काम येत्या तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

यासोबतच महसूल, पाणीपुरवठा आणि वनविभागासह दुष्काळ निवारणावर काम करणाऱ्या ११ प्रमुख विभागांच्या सर्व कल्याणकारी उपाययोजना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हीजेएनटीसाठी अभ्यास समिती

मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीच्या धर्तीवर व्हीजेएनटी समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन केली जाईल. याशिवाय सर्व शासकीय विभागांमधील ओबीसी प्रवर्गातील २७ टक्के रिक्त पदांचा अनुशेष (बॅकलॉग) तातडीने भरण्यासाठी पावले उचलली जातील. 'सारथी'च्या धर्तीवर 'महाज्योती' संस्थेची व्याप्ती वाढवून अधिक प्रभावीपणे काम केले जाईल.

ओबीसी वसतिगृहे

राज्यभरातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी ३६ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ५०० क्षमतेची ओबीसी वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. यासाठी महसूल विभागामार्फत अवघ्या एक रुपया नाममात्र दराने जमीन उपलब्ध करून दिली जाणार असून, एमएसआयडीसीने या वसतिगृहांचे अधिकृत डिझाइन तयार केले आहे. भटक्या व विमुक्त जातींना विकासनिधीचा थेट लाभ मिळावा यासाठी ओबीसी बजेटमधून व्हीजेएनटीचे बजेट वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT