मुंबई : पुढारी न्यूज महासमिट २०२६च्या व्यासपीठावर दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या चर्चा उडवून लावल्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्यांबद्दल आनंद व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जोपर्यंत आमच्या नेत्यांना भेटताहेत तोपर्यंत काळजीचे कारण नाही, उलट आनंद आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी २०२९ पर्यंत आपण महाराष्ट्रात असणार, मी महाराष्ट्रातच रहावे अशी आमच्या नेत्यांचीही इच्छा आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले, २०२९ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील आणि २०३४ ला ही मोदीच पंतप्रधान असतील. पंतप्रधान पदाच्या वेटिंगमध्ये राहिले त्यांचे वेटिंग कधीच कन्फर्म झालेले नाही, हा इतिहास आहे. याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत मुंबई आणि दिल्लीच्या राजकारणावर विचारलेल्या थेट प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौफेर टोलेबाजी करीत महायुतीतील मित्रपक्षांच्या राजकारणावरही भाष्य केले आणि विरोधकांच्या अवस्थेवरही टिपणी केली. मुख्यमंत्र्यांशी झालेली ही राजकीय प्रश्नोत्तरे-
प्रश्न : पंतप्रधानपदाची मोठी चर्चा घडते आहे. अगदी विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही आपण पंतप्रधान होणार असे वाटत आहे. शरद पवारांच्यानंतर इतकी चर्चा तुमच्या नावाबद्दल घडते आहे, याकडे तुम्ही कसे पाहता ?
मुख्यमंत्री फडणवीस : या देशाचा इतिहास असा आहे, जे 'पीएम इन वेटिंग' आहेत, ते जन्मभर वेटिंगमध्येच राहिले आहेत. त्यांचे वेटिंग कधीच कन्फर्म झालेले नाही आणि भारतामध्ये तर 'व्हेकन्सी'देखील नाही. नरेंद्र मोदी हेच २०२९ ला पुन्हा पंतप्रधान होणार आहेत आणि २०३४ लाही तेच पुन्हा पंतप्रधान होतील. 'देअर इज नो व्हेकन्सी'.
प्रश्न - एक वेळ शिवसेनेचे समजून घेता येईल, पण विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले असे काँग्रेस नेतेही तुम्ही पंतप्रधान होणार असल्याचे सांगतात. त्यात त्यांना आनंदही वाटतो. भाजप नेत्यांबद्दल काँग्रेस नेत्यांना आनंद होणार असेल तर आणखी किती अच्छे दिन पाहिजेत?
मुख्यमंत्री फडणवीस : नाही, काही लोकं मनापासून शुभेच्छा देतात. काही लोकांना वाटते 'बला टळली' तर बरे आहे, आपल्या डोक्यावरचे तिकडे दिल्लीला पाठवून द्या. पण, पुढारी न्यूजच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे सांगतो की, माझे नेते मला महाराष्ट्रात ठेवू इच्छितात. त्यामुळे २०२९ पर्यंत मी महाराष्ट्रात आहे.
प्रश्न - इथे महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सूत्रेही भाजपकडे म्हणजेच पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीची नेमकी स्थिती काय आहे, भाजप त्याकडे कसे पाहते आहे?
मुख्यमंत्री फडणवीस : राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातला तिसऱ्या क्रमांकाचा एक मोठा पक्ष आहे. या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याची स्वतःची कार्यपद्धती आहे, त्या पद्धतीने तो पक्ष चालतो. सुरुवातीच्या काळामध्ये अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा वहिनींकडे नेतृत्व आले. तेव्हा त्या राजकारणात नवख्या होत्या. त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी होती की, आम्ही त्यांना मदत केली पाहिजे. त्यानुसार आम्ही मदत करत होतो. आता त्या स्वतःहून आपल्या पायावर उभ्या आहेत. त्यांचा पक्ष स्वतःच्या पायावर उभा आहे. तो पक्ष नीट चालवित आहेत. मात्र, त्यांना भविष्यातही काही मदत लागेल ती आम्ही करणारच आहोत. माझे आणि अजितदादांचे संबंध हे अतिशय जिव्हाळ्याचे आणि वैयक्तिक होते. त्यामुळे मला तर ती माझी जबाबदारीच वाटते. पण, याचा अर्थ तो पक्ष मी चालवतो किंवा भाजप चालवते, असे म्हणणे योग्य होणार नाही. त्यांचे निर्णय तेच घेतात. त्यांचे निर्णय कोणी दुसरे घेत नाही.
प्रश्न - मग आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय दिल्लीमध्ये घेतला जाणार आहे का? कारण भाजपने मागणीच केली होती की, एकत्र येणार असाल तर आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे, तुम्हीच तसे विधान केले होते ?
मुख्यमंत्री फडणवीस : ते एकत्र येणार की नाही, हे तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. जे घडलेलेच नाही, त्याच्यावर इथे चर्चा करून काय फायदा? जेव्हा घडेल, तेव्हा चर्चा करू. आमच्या मित्रपक्षांसोबत अन्य कोणता वेगळा पक्ष येणार असेल, तर आमच्याशी चर्चा केली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. याच्या पलीकडची आमची अपेक्षाच नाही. निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. त्यांना घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा, नसेल घ्यायचा तर घेऊ नये. मात्र, एकत्र येण्याचा निर्णय घेणार असतील तर आम्हाला सांगा, इतकेच आमचे म्हणणे. कारण, शेवटी महायुतीतील मोठा पक्ष म्हणून नवीन येणार्याला सामावून घ्यायचे, त्यांच्यासाठी जागा तयार करण्याचे काम तर आम्हालाच करावे लागणार आहे ना! तेवढीच आमची अपेक्षा आहे.
प्रश्न - पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जेव्हा जेव्हा दिल्लीतील भेटी वाढतात तेव्हा वेगळ्या चर्चा सुरू होतात, त्याचे काय ?
मुख्यमंत्री फडणवीस : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जोपर्यंत आमच्या नेत्यांना भेटताहेत तोपर्यंत काळजीचे कारण नाही. आमच्या नेत्यांच्या ऐवजी ते दुसर्या नेत्यांना भेटतील त्यावेळेस काळजी वाटू लागेल. ते दिल्लीत जातात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात, कधी गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटतात. ते दिल्लीत आमच्याच नेत्यांना भेटतात, याचा मला मनापासून आनंद आहे. ते आणखी दोन वेळा जास्तीचे दिल्लीला गेले तरी मला आनंदच आहे. देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)चे सरकार आहे. एकनाथ शिंदे हे त्या सरकारमधील प्रमुख घटकपक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे दिल्लीत वेगवेगळ्या बैठका होत असतात. घटक पक्षांच्या बैठका असल्याने घटकपक्षाच्या प्रमुखांना बैठकीसाठी बोलवले जाते. त्यामुळे अनेक वेळा मला बोलवणे नसते. कारण ती घटक पक्षाच्या प्रमुखांची बैठक असते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी जातात आणि आपल्याच नेत्यांना भेटतात याचा मला मनापासून आनंद आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत रॅपिड फायर राऊंडमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना डीजेमुक्त गणेशोत्सवावर सूचक भाष्य केले आणि पारंपरिक गणेशोत्सवाचे नेतृत्व पुणे शहराने करावे असे सूचित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांशी झालेली ही ‘हटके’ प्रश्नोत्तरे-
प्रश्न - डीजेमुक्त गणेशोत्सव की डीजेयुक्त गणेशोत्सव?
मुख्यमंत्री फडणवीस : महाराष्ट्राला पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रेरणा देण्याची क्षमता पुण्यात आहे. मला विश्वास आहे की, पुणेकर ते काम करतील. कदाचित त्याला आणखी एखाद्-दोन वर्षे लागतील. पण त्याची सुरुवात या वर्षापासून पुणेकर करतील. याबाबत माझे मत आहे की, या गोष्टी स्वयंप्रेरणेने झाल्या पाहिजेत, पोलिसांच्या दबावाने नाही. यापूर्वी काही जिल्ह्यांनी हे करून दाखवले आहे. यावर्षी नागपूरमध्येदेखील हा प्रयत्न चालला आहे. सगळ्यांनी एकत्रित येत पारंपरिक पद्धतीने आपला गणेशोत्सव कसा करायचा, असा प्रयत्न चालला आहे. पुणेकरही त्या दिशेने जातील, असा मला विश्वास आहे.
प्रश्न - मुख्यमंत्री फडणवीसांचा आवडता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता? फेसबुक, एक्स की इन्स्टाग्राम?
मुख्यमंत्री फडणवीस : पॉलिटिकल कमेंट एक्सवर होते, पण कम्युनिकेशन इन्स्टाग्रामवर होते.
प्रश्न - देवेंद्र फडणवीसांचा आवडता हिंदुत्ववादी नेता कोणता? नितेश राणे, संग्राम जगताप की महेश लांडगे?
मुख्यमंत्री फडणवीस : हे तिघेही हिंदू नायक आहेत, हिंदुत्वाकरीता काम करत आहेत. त्यांनी हिंदुत्वाकरताच काम केले पाहिजे. ते करताना माझी एकच अपेक्षा आहे की, हिंदुत्वाचा मूळ गाभा हा सहिष्णुता आहे. ती सहिष्णुता आपण समजून घेतली पाहिजे. सर्वसमावेशकता असली पाहिजे. पण, सर्वसमावेशकतेचा अर्थ कोणी आपल्या थोबाडात मारले तर दुसरा गाल पुढे करणे, असा होत नाही. थोबाडात मारणाऱ्याच्या थोबाडातच मारली पाहिजे. मात्र, आपण स्वतःहून कोणाच्या थोबाडात मारू नका. हिंदू सहिष्णूच आहे आणि तो सहिष्णूच राहिला पाहिजे. सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा दागिना आहे.
प्रश्न - सर्वात खटकणारे विरोधी व्यक्तिमत्त्व कोणते? संजय राऊत, उद्धव ठाकरे, मनोज जरांगे?
मुख्यमंत्री फडणवीस : नाही. तिन्ही खटकत नाहीत.
प्रश्न - सर्वाधिक आपुलकी वाटणारा प्रोजेक्ट कोणता? कनेक्टिंग लिंक, समृद्धी महामार्ग की प्रस्तावित असलेला शक्तिपीठ ? की बुलेट ट्रेन, नवी मुंबई विमानतळ की मुंबईतील मेट्रो?
मुख्यमंत्री फडणवीस : हे सगळेच प्रकल्प मनाला भावणारे आहेत. या प्रत्येक प्रकल्पाच्या मागे एक-एक स्टोरीसुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याशी माझे एक अतिशय भावनिक नाते आहे. पण आज जर तुम्ही विचाराल तर देशाला आणि महाराष्ट्राला बदलण्याची क्षमता असलेला वाढवणचा प्रकल्प. वाढवण प्रकल्पाची क्षमता ही कोणाच्या लक्षात येत नाही आहे. आज जी आपली मॅरिटाईम पॉवर ही जेएनपीटी बंदरामुळे आहे त्यामुळे गेली ३० वर्षे महाराष्ट्र हा देशामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला. पण वाढवणचे जे बंदर आहे ते जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठे आहे. जेएनपीटी हे जगातल्या पहिल्या ३० बंदरांमध्ये येत नाही, वाढवणचे बंदर हे जगातल्या पहिल्या १० बंदरांमध्ये येते. वाढवणमध्ये २० मीटर 'डीप ड्राफ्ट' आहे. त्यामुळे जगातले सगळ्यात मोठे जहाज जेएनपीटीवर येऊ शकत नाही पण ते वाढवणला येऊ शकते. व्यापारामध्ये ज्याच्याकडे मेरिटाईम पॉवर आहे तोच व्यापाराचा राजा आहे. वाढवण बंदरामुळे एकट्या पालघर जिल्ह्यात भविष्यात दहा लाख रोजगार निर्माण होऊ शकतील. महाराष्ट्र एक प्रकारे मेरिटाईम पॉवर तर बनेल. तसेच, पुरवठा साखळीमधला जो लाॅजिस्टिकचा खर्च १४ टक्क्यांवरून ७ टक्क्यावर आणणे शक्य होणार आहे. मला जर विचाराल तर, पुढच्या २५-३० वर्षांनी जेंव्हा लोक भारताकडे महाशक्ती म्हणून पाहतील त्यात सगळ्यात मोठा वाटा एकट्या वाढवण बंदराचा असणार आहे.
प्रश्न - २०२९ नंतर महाराष्ट्र की दिल्ली ?
मुख्यमंत्री फडणवीस : पक्ष पाठवेल तिथे. पक्षाने महाराष्ट्रात पाठविले तर महाराष्ट्र, पक्षाने दिल्लीत पाठविले तर दिल्ली. आणि पक्षाने सांगितले नागपूरला जा, ते धरमपेठ.