Pudhari Maha Icon 2026 Pudhari
मुंबई

Abhay Bang Pudhari Maha Icon: आता ‘आरोग्य स्वराज्य’ हवे : डॉ. अभय बंग

Maha Icon Award: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग सोशल इम्पॅक्ट विभागातील जीवनगौरव स्वीकारण्यास येऊ शकले नाहीत. त्यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे आपले मनोगत व्‍यक्त केले

पुढारी वृत्तसेवा

Pudhari Maha Icon 2026


मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग सोशल इम्पॅक्ट विभागातील जीवनगौरव स्वीकारण्यास येऊ शकले नाहीत. त्यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे आपले मनोगत व्‍यक्त केले, ते त्यांच्याच शब्दांत-गेल्या २०-२५-५० वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजातील प्रश्न वेचायचे, हे प्रश्न समाजापुढे मांडायचे आणि प्रसारमाध्यमे ते प्रश्न उचलून धरायचे अशी परिस्थिती होती, आणि त्याच वेळी सुजाण राजकीय नेते त्यांना अप्रिय वाटल्या तरी त्या चांगल्या विचार आणि गोष्टींचे समर्थन करायचे. सामाजिक कार्यकर्ते, माध्यमे आणि राजकीय नेते यांच्यात एक निरोगी जोडी होती.

गेली ३० वर्षे समाजातील अनेक प्रश्नांवर मी समाजासोबत आणि त्याचवेळी विलासराव देशमुख, नितीन गडकरी, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी काम करू शकलो. पण गेल्या काही दिवसांत हा सांधा तुटल्यासारखा झाला आहे. आता पुढारी वृत्तसमूहाने हा तुटलेला सांधा मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

मी गेली ३८ वर्षे आदिवासींच्या प्रश्नांवर काम करतो आहे. तिथे प्रश्नांची कमी नाही, आम्ही त्यांच्या प्रश्नांवर आरोग्य संसद भरवतो, यात आम्ही लोकांनाच त्यांच्या आरोग्याच्या कळीच्या कोणत्या प्रश्नावर आम्ही काम करावे हे समजून घेतो, हे समजून घेतल्याने आम्ही बालमृत्यू, व्यसनमुक्ती या प्रश्नांवर काम करू शकलो.

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी झाली आणि गेली १० वर्षे तिथे दारू आणि तंबाखूच्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी मुक्तिपथ प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या प्रकल्पामुळे कमी होण्याची मदत होते. त्यामुळे दारू आणि तंबाखू व्यसनांत गडचिरोली जिल्ह्यात मोठी घट होऊन लोकांची वर्षाला १०० कोटींची बचत होते आहे.

बालमृत्यू आणि व्यसनमुक्ती या प्रश्नांवर आम्ही काम केले असले तरी अनेक प्रश्न सोडवायचे बाकी आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी ‘आरोग्य स्वराज्य’ अशी कल्पना आम्ही निश्चित केली आहे. कोणावरही अवलंबून नसणारा, आपले आरोग्य आपल्या हाती असणारा स्वस्थ म्हणजे निरोगी माणूस अशी निरोगी माणसाची व्याख्या आहे. पण आपण आपले आरोग्य शासन, दवाखाने आणि विमा कंपन्यांच्या हाती दिले आहे.

समाजाने स्वतःचे आरोग्य सांभाळण्यासाठी दारू, तंबाखू ही व्यसने आणि आळस सोडून जीवनशैली स्वीकारली तर आरोग्य स्वराज्य प्रत्यक्षात येईल. गावपातळीवर आरोग्य सांभाळण्याची रचना प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयोग आहे, महाराष्ट्रातील एकीकडे गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया,बालमृत्यू, दारूचा प्रश्न आणि देशपातळीवरील आरोग्य स्वराज्याचा प्रश्न यावर गेली अनेक वर्षे आम्ही काम करतो आहोत. या कामाची दखल जीवनगौरव पुरस्कार देत पुढारी वृत्तपत्र समूहाने घेतली, याचा आनंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT