मुंबई : अंधेरीतील प्रोव्होग इंडिया लिमिटेड या कंपनीची सुमारे 90 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार मुख्य आरोपींसह एका खासगी कंपनीविरुद्ध मंगळवारी आंबोली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अमीत हनुमानप्रसाद गुप्ता, समीर नंदकिशोर खंडेलवाल, राकेश धनश्याम रावत, अर्पित खंडेलवाल व त्याची कंपनी प्ल्युटस इनवेस्टमेंट ॲण्ड होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक व पदाधिकारी आदींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंधेरीतील रहिवाशी असलेले तक्रारदार उद्योगपती असून त्यांची प्रोव्होग इंडिया लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. कंपनीचे पूर्वीचे नाव ॲक्मे क्लोथिंग प्रायव्हेट लिमिटेड असे होते. 1994 साली कंपनीची स्थापना झाली होती. अकरा वर्षांपूर्वी त्यांच्या दमणच्या कारखान्याला मोठी आग लागली होती.
या आगीत कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. त्यात आर्थिक अडचणीमुळे कंपनीला बँकेचे कर्ज फेडता आले नव्हते. त्यामुळे बँकेने कंपनीत अमीत गुप्ता यांची एनसीएलटी म्हणून नियुक्ती केली होती. यावेळी कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार गुप्ता यांच्यासह कंपनीचे माजी संचालक समीर खंडेलवाल आणि राकेश रावत हे तिघेच पाहत होते.
2023 साली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या विक्रीचा लिलाव पूर्ण झाला. काही दिवसांनी तक्रारदारांनी कंपनीच्या रिटेंशन बँक खात्याची माहिती मिळवल्यावर त्यांना निर्यातदारांकडून 32 कोटी 71 लाख रुपये येणे बाकी असल्याचे समजले. मात्र ही रक्कम आरोपींनी परस्पर आपसांत वाटून पैशांचा अपहार केला होता.
या कंपनीची मूळ किंमत 54 कोटी 72 लाख रुपये होती. मात्र कंपनीची विक्री करताना दुसऱ्या कंपनीला कमी भावात कंपनी विकत घेता यावी यासाठी या आरोपींनी दोन वर्ष लिलाव प्रक्रिया लांबणीवर टाकली. त्यात दुसऱ्या कंपनीला फायदा झाला, तर या कंपनीला 54 कोटी 72 लाखांचे नुकसान सोसावे लागले. अशाप्रकारे या आरोपींनी कंपनीची सुमारे 90 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार तक्रारदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमीत गुप्ता, समीर खंडेलवाल, राकेश रावत, अर्पित खंडेलवाल व त्यांच्या कंपनीच्या संचालकासह पदाधिकाऱ्यांनी कट रचून कंपनीच्या 90 कोटींचा अपहार करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले.