मुंबई : कोस्टल रोडच्या वाढलेल्या खर्चाला विरोध करत हा खर्च का वाढला याचे सविस्तर निवेदन करा, अशी मागणी करत वाढीव खर्चाचा प्रस्ताव राखून ठेवला. त्यामुळे प्रशासनाला आता वाढीव खर्चाबाबत सविस्तर माहिती देणे बंधनकारक होणार आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंत असलेल्या कोस्टल रोडचा खर्च तब्बल 2 हजार 220 कोटी रुपयाने वाढला आहे. या कामासाठी सातव्यांदा फेरफार सुचवण्यात आला असून यात 24 कोटी रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे. कोस्टल रोडचा मूळ खर्च 12 हजार 721 कोटी रुपये होता तो आता 14 हजार 941 कोटी रुपयावर पोहचला आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आला असता, सर्वपक्षीय सदस्यांनी याला आक्षेप घेतला.
महापालिका एखादा प्रकल्प हाती घेत असताना त्या प्रकल्पाचा तज्ञांमार्फत अभ्यास करून त्याचे अंदाजपत्र तयार करण्यात येते. त्यानंतरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येतात. मग प्रशासनाचा अंदाज चुकतोच कसा, कोस्टल रोड प्रकल्पासाठी सात वेळा कंत्राटामध्ये फेरफार करण्यात आला.
महापालिकेने कशासाठी खर्च वाढलाय, हे घोषित केले असले तरी अचानक खर्च का वाढला, कामांची तेव्हा गरज नव्हती का, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्यामुळे प्रशासनाचे ठोस उत्तर येईपर्यंत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि प्रस्ताव राखून ठेवला.
खर्चात सात वेळा झालेली वाढ
वस्तू व सेवा कर - 339 कोटी 32 लाख रुपये
जलवाहतूक मार्गाचे काम - 922 कोटी 92 लाख रुपये
नवीन टेट्रापॉड - 46 कोटी 27 लाख रुपये
हाजी अली वाहनतळ - 749 कोटी 29 लाख रुपये
बोगद्यातील वायूविजन - 30 कोटी 21 लाख रुपये
आराखड्यातील बदल - 107 कोटी 56 लाख रुपये
पादचारी अंडरपास - 24 कोटी 32 लाख रुपये