

मुंबई : आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून मानखुर्द परिसरातील 133 जणांची एका खासगी कंपनीने सुमारे 5 कोटी 13 लाखांची फसवणूक केली आहे. ड्रिम सनशाईन डिजीटल प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव असून त्याचे मालक अमानत अली अन्सारी, त्याचे चार पार्टनर भागीदार रहिम अब्दुल अन्सारी, नवाजीस अली अन्सारी, नईम सरवर आणि योगिनी शिर्के अशा पाच जणांविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते पाचही आरोपी पळून गेले आहेत.
मानखुर्द येथील मोहीते पाटीलनगर येथे कार्यालय असलेली ही या कंपनी रिअल ऑस्सी वॉटर, साखर, खजूर आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून त्यातून कंपनीला मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो. त्यातून कंपनीने जास्त फायदा मिळवून देत असल्याचे सांगून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून ही फसवणूक झाली आहे. पाच टक्के परताव्याचे आमीष दाखवण्यात आले होते.
फसवणूक झाल्याचे समजाताच गुंंतवणूकदारांनी मानखुर्द येथील कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र कार्यालय बंद होते. कंपनीचे मालक तसेच इतर पार्टनर कंपनीला टाळे लावून पळून गेल्याचे समजले. उपस्थित 133 हून अधिक गुंतवणुकदारांनी कंपनीच्या विविध योजनेत 5 कोटी 13 लाख 85 हजार रुपांची गुंतवणूक केली होती. यात आणखी गुंतवणूकदार पुढे आल्यानंतर हा आकडा वाढणार आहे.
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी मानखुर्द पोलिसांना घडलेला प्रकार सांगून कंपनीच्या मालकासह पार्टनरविरुद्ध तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर वरील पाच जणांवर पोलिसांनी अपहारासह फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाचही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
फसवणूक अशी आली समोर
यातील एक तक्रारदार आयटी इंजिनिअर असून ते ट्रॉम्बे परिसरात राहतात. त्यांना त्यांच्या मित्रांकडून ड्रिम सनसाईन कंपनीविषयी माहिती मिळाली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमाह पाच टक्के व्याजदर मिळत असल्याचे त्यांच्या मित्राने सांगितले होते. त्यामुळे ते मानखुर्द येथील कंपनीच्या कार्यालयात गेले होते. तिथेच त्यांची अमानतअली अन्सारी यांच्यासह योगिनी शिर्के, नईम सरवर आणि रहिम अन्सारी याची भेट झाली होती.
अमानतअलीने तो कंपनीचा मालक तर इतर तिघेही त्याचे कंपनीतील पार्टनर असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांना गुंतवणूक योजनेची माहिती सांगितली होती. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या आठ परिचितांनी कंपनीत 23 लाख 70 हजाराची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना नियमित दरमाह व्याजाची रक्कम मिळत होती. मात्र फेब्रुवारी 2026 पासून त्यांना व्याजाची रक्कम मिळणे बंद झाल्यानंतर अधिक चौकशीत फसवणूक झाल्याचे समोर आहे.
ही कंपनी रिअल ऑस्सी वॉटर, साखर, खजूर आणि बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करत असून त्यातून कंपनीला परतावा मिळतो. त्यातून कंपनीत त्यांच्या गुंतवणूकदारांना जास्त फायदा मिळवून देत असल्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन केला.