Real Estate Pudhari
मुंबई

Real Estate Investment: रिअल इस्टेटमधील खासगी गुंतवणुकीत २३ टक्क्यांची घट

जागतिक अस्थिरता, पश्चिम आशियातील संघर्षामुळे गुंतवणूकदारांची सावध भूमिका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील खासगी गुंतवणुकीत २०२६ च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून) २३ टक्क्यांनी घट झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, पश्चिम आशियातील संघर्ष यामुळे गुंतवणूकदारांनी अधिक सावध भूमिका घेतल्याने खासगी गुंतवणुकीला ओहोटी लागली आहे.

जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत रिअल इस्टेटमध्ये १.४७ अब्ज डॉलरची (सुमारे १६ हजार कोटी रुपये) गुंतवणूक झाली होती. त्यात यंदा १.१३ अब्ज डॉलर्सपर्यंत (१२,२६६ कोटी रुपये) घट झाली असल्याचे नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.

नाइट फ्रँक इंडियाचे आंतरराष्ट्रीय भागीदार, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले की, जागतिक स्तरावर वाढलेले व्याजदर, रोख रकमेची (लिक्विडिटी) मर्यादित उपलब्धता आणि उदयोन्मुख व विकसित बाजारपेठांमधील घटलेला परतावा यामुळे गुंतवणूकदारांनी अधिक सावध भूमिका घेतली आहे.

त्यामुळेच गुंतवणूकदार अधिक चोखंदळपद्धतीने गुंतवणूक करताना दिसत आहेत. गुंतवणूकदारांचा कल उत्पन्न मिळवून देणाऱ्या आणि वापरासाठी सज्ज असलेल्या मालमत्तांकडे झुकला आहे.

पूर्ण झालेल्या कार्यालयीन मालमत्तांचा एकूण गुंतवणुकीतील वाटा सुमारे ७५ टक्क्यांवर गेला आहे. हा वाटा २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ५३ टक्के होता. यावरून गुंतवणूकदार कमी जोखीम असलेल्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे दिसून येत आहे.

कार्यालयीन जागांना पसंती

देशात २०२६ च्या पहिल्या सहामाहीत 'ऑफिस स्पेस' (कार्यालयीन जागा) क्षेत्राला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

एकूण खासगी गुंतवणुकीपैकी ८९ टक्के हिस्सा याच क्षेत्राचा आहे. जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी), बहुराष्ट्रीय कंपन्या आणि देशांतर्गत कंपन्यांकडून कार्यालयीन जागांना चांगली मागणी असल्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक ३३ टक्क्यांनी वाढून जवळपास ९९.८ कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे.

निवासी क्षेत्रातही घट

निवासी क्षेत्रातीच २०२५ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा गुंतवणूक २९.७ कोटी डॉलर्सवरून घसरून १२.८ कोटी डॉलर्सवर आली आहे. घरांची मागणी मूलभूत पातळीवर भक्कम असूनही, नवीन प्रकल्प उभारणीशी संबंधित गुंतवणुकीबाबत अधिक सावध पवित्रा घेतल्याचे यातून दिसून येते.

गुंतवणुकीत पुणे दुसऱ्या स्थानी

गुंतवणुकीच्या बाबतीत नवी दिल्ली देशात आघाडीवर आहे. दिल्लीत रिअल इस्टेटमध्ये ४१.१ कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली. पुणे दुसऱ्या स्थानावर असून, २०२५ सालाच्या पहिल्या सहामाही मध्ये येथे १३.४ कोटी डॉलरची गुंतवणूक झाली होती. त्यात ३५.५९ कोटी डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. संस्थात्मक गुंतवणुकीत १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT