मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आमदार प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदांची धुरा देखील ते सांभाळत आहेत.
सहकार क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करताना प्रवीण दरेकर यांनी सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला थेट लाभ होईल अशा नवनवीन योजना सहकारात आणल्या. मुंबईतील सर्वसामान्य जनतेला स्वस्तात मोठे घर तेही बिल्डरशिवाय मिळावे म्हणून त्यांनी आणलेली स्वयं पुनर्विकास योजना राज्य शासनाने स्वीकारली आहे.
लाडक्या बहिणींना मुंबई बँकेतून शून्य टक्के व्याजदराने उद्योगधंद्यासाठी कर्ज देणारी योजनाही त्यांनीच प्रत्यक्षात आणली. सहकार क्षेत्राशी निगडित प्रश्न विधिमंडळात सातत्याने ते मांडत राहिले आहेत.
भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड ही त्यांच्या सहकारातील योगदानाची पोचपावती समजली जाते. भारतातील सर्व क्षेत्रांतील सहकारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर संस्थेवर त्यांची संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल राज्य सरकार, विधिमंडळ आणि सहकार क्षेत्रातून प्रवीण दरेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.