Pravin Darekar Pudhari
मुंबई

Pravin Darekar : रवींद्र धंगेकर, तुमची औकात काय?

भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा पलटवार, वाचाळवीरांना आवर घाला : शिंदेंकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात नेतृत्वबदलाची भाषा करणाऱ्या शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी समाचार घेत रवींद्र धंगेकर तुमची औकात काय, असा सवाल केला आहे.

धंगेकर हे काही अधिकृत किंवा जबाबदार नेते नाहीत. मात्र, ते पुण्याचे महानगरप्रमुख आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय ते बोलूच शकत नाहीत. त्यामुळे धंगेकरांच्या विधानाला शिवसेना पक्षाची संमती आहे का, हे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही दरेकर यांनी करतानाच धंगेकर यांच्यासारख्या वाचाळवीरांना आवर घालण्याचा सल्लाही दिला आहे.

स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असू शकते. त्याला आमची हरकत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्यावर शिंतोडे उडवण्याची तुमची पात्रता आहे का? अशा फुटकळ लोकांच्या वक्तव्यांना भाजप भीक घालत नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला.

फडणवीसांवर बोलताना तुमची कुवत आणि औकात काय? असा सवाल करून दरेकर म्हणाले, महायुतीत राहून आमचेच पाय तोडणाऱ्या ‘शेखचिल्लीं’ना भाजप भीक घालत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्र रस्ते, पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या योजना वेगाने पुढे जात आहेत. मात्र, फडणवीस यांच्याविषयी मनात टोकाचा तिरस्कार आणि पोटात मळमळ बाळगून रोज उठून त्यांच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांची नेमकी कुवत आणि औकात काय आहे? सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचेच तोंड भाजते.

महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याची हिंमत सत्तारांमध्ये कशी येते? सत्तारांचे हे कृत्य वैयक्तिक आहे की पक्षाचा आदेश होता, याचाही खुलासा पक्षनेतृत्वाने केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तुमचे अमरावतीचे किरण सरनाईक कालपर्यंत कुठल्या पक्षात होते? राष्ट्रवादीतून तुमच्या पक्षात आले. विधानसभेला तर भाजपचे नेते आणि आमदार एका रात्रीत पळवून तुम्ही तुमचे उमेदवार केले. एक बोट आमच्याकडे दाखवताना चार बोटे स्वतःकडे आहेत याचे भान ठेवा, असे दरेकर म्हणाले.

भाजप जशास तसे उत्तर देईल

महायुतीत राहायचे, एकाच ताटात जेवायचे आणि आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमचे पाय तोडायचे, हा ‘शेखचिल्ली’सारखा मूर्खपणा चालणार नाही. ज्या फांदीवर बसलात तीच तोडली तर स्वतःचाच कडेलोट होईल, याचे भान मित्रपक्षाने ठेवावे. भाजप कधी टोकाची भूमिका घेत नाही. पण गृहीत धरून सकाळ-संध्याकाळ वार करणार असाल, तर जशास तसे उत्तर द्यायला भाजपही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT