मुंबई : प्रतिक्षानगर येथील संक्रमण शिबिरातील वास्तव्यास धोकादायक ठरलेल्या 4 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला असून संक्रमण इमारतीतील रहिवाशांच्या त्याच अभिन्यासात स्थलांतर करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार म्हाडा करत आहे. या अभिन्यासात विक्री घटकासाठी बांधण्यात येणाऱ्या मध्यम उत्पन्न गटाच्या घरांचा प्रस्ताव रद्द करून तेथे संक्रमण सदनिका बांधण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
म्हाडाच्या या निर्णयानुसार 4 संक्रमण इमारतींतील 261 रहिवासी व 4 दुकानदारांसाठी तळमजला अधिक 22 मजली अशा एकूण 322 संक्रमण सदनिकांचा समावेश असलेल्या 2 इमारती बांधण्यात येणार असून या इमारतींमध्ये त्यांचे स्थलांतर पात्रतेच्या धोरणानुसार केले जाणार आहे. संक्रमण इमारतींचे बांधकाम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षे कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत म्हाडाच्या धोरणानुसार रहिवाशांना भाडे देऊन तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे.
सायन प्रतीक्षानगर येथील संक्रमण इमारत क्रमांक 36, 37, 53 व 54 खालून भूमिगत जलवाहिनी गेली असल्यामुळे या इमारतींना तडे जाण्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मुंबई मंडळाने आयआयटी मुंबई यांच्यामार्फत संबंधित इमारतींचे सर्वेक्षण केले. सदर सर्वेक्षणातील अहवालामध्ये या चारही संक्रमण इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत नमूद करण्यात आले. अहवालाच्या पार्श्वभूमीवर व रहिवाशांची त्याच अभिन्यासात स्थलांतर करण्याची मागणी केली होती. म्हाडाच्या निर्णयामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.