पुढारी ऑनलाईन डेस्क : इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या पत्रकार प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका दिला आहे. कोल्हापूरच्या न्यायालयाने केलेली निरीक्षणे काढून टाकण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रशांत कोरटकरने त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे म्हटले होते. याबाबतचे कोल्हापूरच्या न्यायालयाचे निरीक्षण काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, कोरटकर याला आज कोल्हापूर न्यायालय दिलासा देते की तो पोलिसांना शरण येतो याचा निर्णय होणार आहे.
कोल्हापूर न्यायालयाने प्रशांत कोरटकरला अटकपूर्व अंतरिम जामीन देत अंतरिम दिलासा दिला. आज मंगळवारी (दि. ११) मार्च रोजी या संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वकिलाच्या सल्ल्यानुसार आपण आपली पुढची दिशा ठरवू असे प्रशांत कोरटकरने स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकंदरीत आजच्या निर्णयावर प्रशांत कोरटकरचे भवितव्य अवलंबून आहे.
याबाबत वकील असीम सरोदे यांनी सांगितले की, प्रशांत कोरटकर नावाचा जो तथाकथित पत्रकार आहे त्याने इंद्रजीत सावंत यांच्यासोबत जे वक्तव्य केले ते व्हायरल झाले आहे. त्याची भाषा जातीत तेढ निर्माण करणारी आहे. अशा संशयित आरोपीला जामीन मिळाला ही खळबळजनक बाब होती. म्हणून राज्य सरकारने याचिका केली. आज न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली.
आरोपीला जामीन मिळू नये ही मागणी आम्ही करू. कोल्हापूरच्या न्यायालयात प्रश्न एवढाच आहे की त्याचा जामीन रद्द करायला हवा. आता कोरटकर हा मुंबईत आला आहे हे सर्वांना माहित आहे तरी त्याला अटक केली जात नाही. नेमके याचे कारण काय? राजकीय सरंक्षण आहे का? आज उच्च न्यायालयाने सांगितले आहे की कोणत्याही दबावाखाली येऊ नका.