

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलणाऱ्या पत्रकार प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर न्यायालय दिलासा देते की तो पोलिसांना शरण येतो याचा निर्णय होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या एका बड्या वकिलामार्फत तो आपली बाजू आज मांडणार असून तो मुंबईत दाखल झाला आहे.
कोल्हापूर न्यायालयाने प्रशांत कोरटकरला अटकपूर्व अंतरिम जामीन देत अंतरिम दिलासा दिला असून आज मंगळवारी 11 मार्च रोजी या संदर्भात न्यायालयिन निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वकिलाच्या सल्ल्यानुसार आपण आपली पुढची दिशा ठरवू असे प्रशांत कोरटकरने स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकंदरीत आजच्या निर्णयावर प्रशांत कोरटकरचे भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान, राज्य सरकारने देखील अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या विषयीच्या चर्चेत प्रशांत कोरटकर तर चिल्लर आहे.... इतर बड्या व्यक्तींचे काय ! असे ठणकावून सांगत या प्रकरणी ठोस कारवाई करण्याचे संकेत दिले. दुसरीकडे नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी प्रशांत कोरटकर प्रकरणी अद्यापही ठोस कारवाई का नाही असा सवाल उपस्थित करीत त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.