महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Source- X)
मुंबई

Hindi Language Compulsion | हिंदी सक्तीला विरोध, पण काँग्रेस ५ जुलैच्या मोर्चापासून दूर राहणार?; हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?

गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?

पुढारी वृत्तसेवा

Hindi Language Compulsion Row

मुंबई : भाषा धोरणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप करत काँग्रेसने गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? असा सवाल केला आहे. दरम्यान, हिंदी सक्तीविरोधातील ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चापासून काँग्रेस दूर राहण्याची शक्यता आहे. तसे संकेत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत.

हिंदी भाषेबाबत घेतल्या निर्णयाला आमचा विरोध आहे. पण ५ जुलै रोजी होणारा मोर्चा सर्व काही आहे असे काही नाही. मोर्चाला आमच्या शुभेच्छा. हिंदी सक्तीच्या विरोधात असे अनेक आंदोलन होत आहेत, त्यामुळे याही मोर्चाला आमच्या शुभेच्छा, असे त्यांनी नमूद केले.

एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी हिंदी भाषा संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या मोर्चापासून दूर राहणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा ५ जुलैला निघणार आहे. यामुळे या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत.

गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून हा निर्णय रद्द करावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. ८ व्या सुचीतील सर्वभाषा संपवून केवळ हिंदी एकच भाषा ठेवायची हा संघ व भाजपचा कुटील डाव आहे. हा कुटील डाव हाणून पाडू आणि मराठीचा गळा घोटू देणार नाही, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

मुंबईत शनिवारी (दि. २८ जून) पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, हिंदी भाषेचा सन्मानच आहे. पण सक्ती चालणार नाही. मराठी फक्त भाषा नाही तर आमची जीवनपद्धती आहे. काही राजकीय पक्ष, संघटना व संस्था आपापल्या पद्धतीने या निर्णयाचा विरोध करत आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाच्यावतीने मी साहित्यिकांना पत्र लिहून आवाहनही केले आहे. तर काही जण मोर्चा काढत आहेत. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा हीच सर्वांची दिशा आहे. हा संस्कृतीचा लढा आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन लढले पाहिजे. कोणाचा फोन वा निमंत्रण आले का? हा प्रश्न महत्वाचा नाही. आम्ही पहिलीपासून हिंदीच्या सक्तीविरोधात लढत आहोत, असेही सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी नाही तर मग महाराष्ट्रातच पहिलीपासून हिंदी कशासाठी? गुजरातमध्ये एक निती आणि महाराष्ट्र दुसरी निती कशी? हे फडणवीस आणि बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. तसेच गोलवलकर यांच्या 'बंच ऑफ थॉट'बद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट करावे की, नक्की तेढ निर्माण करणे म्हणजे काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT