मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभादेवीतील प्रभाग क्रमांक 194 मध्ये शिवसेनाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या प्रभागातून शिवसेना उमेदवार व माजी नगरसेवक समाधान सदा सरवणकर यांना अवघ्या 603 मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली.
विधानसभा निवडणुकीत वडील सदा सरवणकर यांचा पराभव झाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीत पुत्र समाधान सरवणकर यांनाही अपयश आले आहे. त्यामुळे प्रभादेवीत शिंदे गटासाठी हा पराभव केवळ एका वॉर्डपुरता मर्यादित न राहता, राजकीय संदेश देणारा ठरला आहे.
निशिकांत शिंदे यांना एकूण 15 हजार 592 मते मिळाली, तर समाधान सरवणकर यांच्या पारड्यात 14 हजार 989 मते पडली. समाधान सरवणकर हे शिंदे गटातील श्रीमंत आणि ताकदवान उमेदवारांपैकी एक मानले जातात. ते माजी नगरसेवक असून सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष असलेल्या सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. त्यामुळे ही लढत सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची ठरली होती.
विजयी उमेदवार निशिकांत शिंदे हे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधील नसून, प्रत्यक्षात सदा सरवणकर आणि सुनील शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष म्हणून पाहिली जात होती. ही लढत दोन शिवसेनांमधील सत्तासंघर्षाचे प्रतिबिंब ठरली.
निशिकांत शिंदे हे प्रभादेवीचे रहिवासी नसल्याचा मुद्दा सरवणकर गटाकडून प्रचारात जोरकसपणे मांडण्यात आला होता. मात्र लोअर परळमधील रहिवासी असले तरी त्या परिसरातील प्रभाग महिलांसाठी राखीव असल्याने निशिकांत यांना प्रभादेवीतून उमेदवारी देण्यात आली होती. ही बाब मतदारांनी फारशी गृहीत धरली नाही, हे निकालातून स्पष्ट झाले आणि आधी विधानसभा आणि आता महापालिका असा दुहेरी पराभव सरवणकरांचा झाला.