मुंबई: जुन्या एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी आणि ३९ प्रवासी जखमी झाले होते. या घटनेला नऊ वर्ष होत आहेत. मात्र, येथील प्रवासी गर्दी कमी झालेली नाही.
अशा जीवघेण्या गर्दीत प्रवाशांना पादचारी पूल चढणे- उतरणे भाग पडत असून, येथील वाढत्या गर्दीवर तातडीने पर्याय शोधावा अन्यथा पुन्हा एखादी दुर्घटना येथे घडू शकते, अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
पूर्वीचे एल्फिन्स्टन आणि आताचे नवे प्रभादेवी रेल्वे स्टेशन येथे २९ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेला होता आणि जवळपास ३९ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले होते.
तेव्हा भारतीय लष्कराने तातडीने येथे पादचारी पूल बांधला. या सर्व घटनांना आता नऊ वर्षे उलटली. आजही गर्दी वाढत असल्याने हा पादचारी पूल चढायला सात ते आठ मिनिटे लागत आहेत. शिवाय प्रभादेवी स्थानकात नव्याने सुरू असलेल्या रेल्वे कामांमुळे येथे सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसच्या वेळेत प्रचंड गर्दी असते.
पादचारी पूल चढण्यास लागणारा वेळ, प्रत्येक प्रवाशाला पुढे सरकण्याची असलेली घाई, त्यातून सतत होणारी ढकलाढकली यातून गर्दी टाळून बाजूला होण्यासही जागा नसते. जेव्हा दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी लोकल येते तेव्हा तर गर्दी आणखीच वाढते. त्यामुळे अशा भर गर्दीत रोज पायऱ्या चढणे-उरतणे धोकादायक होत चालले आहे.
या गर्दीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढला नाही, तर आणखी एक दुर्घटना घडू शकते, अशी भीती अंबरनाथ येथून प्रभादेवीत कामाला येणाऱ्या प्रमोद मोरे यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली.
प्रभादेवी स्थानकावर वेगवेगळ्या दिशेने लोक एकाच वेळी एकाच पुलावर येतात. त्यामुळे गर्दी इतकी होते की, काही क्षण पाय देखील उचलता येत नाही. अशात पाऊस सुरू झाला की अधिकच भीती वाटते. टिळक भवन आणि इंडियाबुल्सकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे येथे सर्वाधिक वर्दळ असते.
येथे एल्फिन्स्टन पुलाची कामे सुरू आहेत. त्या कामांमुळे गोंधळ अधिकच वाढला आहे. गर्दीच्या वेळी पादचाऱ्यांना अरुंद मार्गांमधून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. काही नवी आफत ओढवण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने या गर्दीचे व्यवस्थापन करावे, अशी मागणी अनेक प्रवाशांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली.
दररोज ३.५ लाख प्रवासी प्रभादेवी-परळ स्टेशनवर
पश्चिम रेल्वेच्या सुमारे ४०० उपनगरीय गाड्या आणि मध्य रेल्वेच्या सुमारे ३०० गाड्या दररोज परेल येथे थांबतात. दररोज सुमारे ३.५ लाख प्रवासी प्रभादेवी-परेल स्टेशन परिसराचा वापर करतात. अशात येथील तीन पादचारी पुलाचे लँडिंग्स पाडण्यात आले आहेत.
त्यामुळे पुलाच्या दक्षिण बाजूला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ज्यांना उलट दिशेने प्रवेश करायचा आहे त्याना गर्दीच्या वेळी १४ आरपीएफ जवान आणि तीन वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन आणि सुरक्षेसाठी असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.