Prabhadevi residents relocation issue pudhari photo
मुंबई

Prabhadevi residents relocation issue : दोन दिवसांत घरे रिकामी करा!

प्रभादेवीतील हाजी नुरानीच्या रहिवाशांना एमएमआरडीएची नोटीस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पर्यायी घरांच्या चाव्या मिळूनही मूळ घरे रिकामी न करणाऱ्या प्रभादेवी पूलबाधित हाजी नुरानी इमारतीतील रहिवाशांना आता एमएमआरडीएने शेवटची संधी दिली आहे. दोन दिवसांत घरे रिकामी करा, पाडकामात घरातील सामानाचे नुकसान झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, अशी अंतिम नोटीस बजावली आहे.

शेकडो वर्षे जुना प्रभादेवी पूल पाडून येथे दुमजली पूल उभारला जात आहे. यात बाधित होणाऱ्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी इमारतीतील 83 रहिवाशांना अन्यत्र घरे देण्यात आली आहेत. 405 चौरस फुटांची घरे देण्यात येणार होती; मात्र म्हाडाकडून एमएमआरडीएला मिळालेली घरे समान आकाराची नव्हती.

त्यामुळे ज्यांनी 405 चौरस फुटांपेक्षा लहान घरे मिळाली आहेत. त्यांना उर्वरीत क्षेत्रफळासाठी काही रक्कम उचलून देण्यात आली आहे. याउलट ज्यांना मोठी घरे मिळाली आहेत त्यांना अतिरिक्त क्षेत्रफळासाठी काही रक्कम भरावी लागणार आहे.

मात्र एमएमआरडीएने दिलेली काही घरे राहण्यासाठी योग्य नाहीत. त्यामुळे तेथे डागडुजी करावी लागत आहे किंवा काहीजणांना घरे बदलून घ्यावी लागली आहेत. मुनाफ ठाकूर यांना प्रियदर्शनी इमारतीत घर देण्यात आले आहे. मात्र येथे स्वच्छतागृहाला गळती असल्याने डागडुजीचे काम करावे लागत आहे. यासाठी 80 हजार रुपये खर्च येणार आहे. त्यांना 479 चौरस फुटांचे घर मिळाल्याने 18.5 लाख भरावे लागले आहेत.

सध्या या इमारतीत साधारण 10 कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांनी घरे रिकामी केल्याशिवाय पुलाचे काम पुढे जाणार नाही. त्यामुळे 24 एप्रिलपर्यंत घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. 27 एप्रिलला निष्कासन कार्यवाही केली जाणार आहे.

मोठी घरे स्वीकारा, पैसे भरा!

रोहीत मयेकर यांना पवन इमारतीत 379 चौरस फुटांचे घर देण्यात आले होते. उर्वरीत क्षेत्रफळासाठी त्यांनी काही रक्कम एमएमआरडीएकडून मिळणार होती. मात्र ही इमारत पूर्ण रिकामी आहे. तेथे कोणीही राहात नाही. उद्वाहन आणि पाणी याबाबत अडचणी आहेत. त्यामुळे मयेकर यांनी येथील घर नाकारले. त्यानंतर त्यांना प्रभादेवी येथे 454 चौरस फुटांचे घर देण्यात आले. आता अतिरिक्त क्षेत्रफळासाठी त्यांना 22 लाख रुपये भरावे लागणार आहे. लहान घराची मागणी करूनही त्यांना मोठे घरच स्वीकारावे लागले. रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना 15 दिवसांचा कालावधी हवा आहे. त्यांच्यासारखी आणखी काही कुटुंबे हाजी नुरानी इमारतीत सध्या वास्तव्यास आहेत.

शिवडी आणि वरळी येथे पुलाचे काम अपूर्ण असतानाही इमारत रिकामी करण्यासाठी दबाव आणला जात आहे. लक्ष्मी निवास ही इमारत रिकामी होऊनही अद्याप पाडलेली नाही. मग आमच्यावर दबाव का ? एमएमआरडीएने घरे दिली आहेत पण डागडुजीसाठी वेळ देत नाहीत. किमान मे महिन्यापर्यंत वेळ द्यावा.
मुनाफ ठाकूर, रहिवासी, हाजी नुरानी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT