मुंबई : सर्व 19 इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण स्पष्ट होत नाही तोपर्यंत पूल बंद होऊ देणार नाही असे म्हणत पुन्हा एकदा प्रभादेवी पूलबाधित रस्त्यावर उतरले. बुधवारी रात्री पूल बंद होत असल्याचे फलक लावण्यात आल्याने रहिवाशांनी विरोध सुरू केला.
अटल सेतूवरून थेट वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणार्या वरळी-शिवडी उन्नत जोडरस्त्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल तोडण्यात येणार आहे. यात 19 इमारती बाधित होणार होत्या. दरम्यानच्या काळात पुलाच्या आरेखनात बदल होऊन 17 इमारती वाचवण्यात आल्या. हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोनच इमारती आता बाधित होणार आहेत. त्यांतील 84 रहिवाशांना कुर्ला येथे कायमस्वरुपी घरे देण्यात येणार होती.
एप्रिल महिन्यात पुलाचे पाडकाम सुरू करत असताना रहिवाशांनी त्यात अडथळा आणला. पुलाच्या कामादरम्यान उर्वरीत 17 इमारतींनाही हादरे बसण्याची भीती रहिवाशांना आहे. सर्व 19 इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतचे ठोस धोरण तयार होत नाही तोपर्यंत पूल बंद करू देणार नाही, अशी भूमिका घेत रहिवाशांनी आंदोलन केले होते. त्यानंतर सर्व 19 इमारतींचा एमएमआरडीएतर्फे त्याच ठिकाणी पुनर्विकास करण्याचा निर्णय झाला; मात्र नगरविकास विभागाने त्याबाबत आवश्यक कार्यवाही केलेली नाही.
गणेशोत्सवानंतर 10 सप्टेंबरपासून पूल बंद करण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र वाहतूक विभाग किंवा एमएमआरडीएने त्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्रसिद्ध केली नव्हती. बुधवारी रात्री पूल बंद होत असल्याचे फलक लावल्यानंतर रहिवासी पुन्हा रस्त्यावर आले. पश्चिमेकडील फलकाला स्थानिकांनी काळे फासले.