

Veteran Labour Leader passes away
मुंबई : ज्येष्ठ कामगार नेते सर्व श्रमिक संघ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, बांधकाम कर्मचारी संघ आणि अशा अनेक युनियनचे प्रणेते, अध्यक्ष आणि आधारस्तंभ कॉम्रेड मारुती आबा पाटील (एम ए पाटील) यांचे आज (दि.११) पहाटे अल्पशः आजाराने निधन झाले. मागील आठवड्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या आदल्या दिवसांपर्यंत सातत्याने ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते.
कॉ. एम ए पाटील यांनी सुरुवातीपासूनच सर्व श्रमिक संघातून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. श्रमिक संघाच्या माध्यमातून तळागाळातील पिचलेल्या कामगारांच्या युनियन संघटित करून त्यांना न्याय मिळवून दिला. अगदी वाळू उपसा कामगार, रोलिंग मिल कामगार यांच्या युनियन मोठ्या जोखीम घेऊन संघटित केल्या. तसेच ग्रामीण भागातील कोतवाल, वनकामगार, ऊसतोड कामगार, अंगणवाडी कर्मचारी, महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना संघटित करून त्यांचे शोषण थांबवून त्यांना न्याय द्यायचा अथक प्रयत्न केला.
कोरोना काळामध्ये कॉम्रेड पाटील यांनी मंत्रालय आणि शासकीय कार्यालयामध्ये तसेच संबंधित मंत्र्यांकडे सातत्याने संपर्क साधून, प्रत्यक्ष भेटी घेऊन अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांचे पगार चालू ठेवले, त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. वाढत्या वयामध्ये येणारे अनेक आजार असूनही कॉम्रेड पाटील सातत्याने कामगार चळवळ, असंघटित कामगार यांच्या विचार करून त्यांच्यासाठी चळवळी बांधण्याचा आणि कामगारांच्या अन्यायाविरुद्ध शासकीय यंत्रणेवर दबाव तयार करण्याचा प्रयत्न करत होते.