मुलुंड : पुढारी वृत्तसेवा
पवई तलावाच्या काठावर सांडपाणीवाहिन्या बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे, असे या प्रकल्पात सहभागी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पवई प्रगत स्थानिक व्यवस्थापन (एएलएम) च्या सदस्यांशी संवाद साधताना सांगितले. अवघड भूभाग, वाढता बांधकाम खर्च, इंधनाच्या दरातील चढउतार व मजुरांची कमतरता यांसारखी आव्हाने असूनही प्रकल्पाने लक्षणीय प्रगती केली आहे. अत्यंत कठीण खडकांच्या थरांमुळे केवळ पवई उद्यान आणि आयआयटी मुंबईसारख्या काही भागांत प्रकल्पाच्या प्रगतीला अडथळा आला आहे.
तथापि, हा प्रकल्प जून अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांची पूर्तता होईल. प्रकल्प वेळेवर पूर्ण झाल्यामुळे १६ एमएलडी सांडपाणी भांडुप पंपिंग स्टेशनकडे व २ एमएलडी सांडपाणी पवई येथील वेस्टिन हॉटेलजवळील पेरू बाग येथील एसटीपीकडे वळवले जाईल. बीएमसीच्या सूत्रांनी असेही संकेत दिले की, तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी पवई येथील सुवर्ण मंदिराजवळील एसटीपीचे बांधकाम गती देऊन एका वर्षाच्या आत पूर्ण केले जावे .
पाईपलाईन प्रकल्प जून अखेरपर्यंत पूर्ण होणार असला तरी, त्याची परिणामकारकता केवळ कोरड्या हवामानात, शक्यतो ऑक्टोबरमध्ये दिसून येईल, जेव्हा तलावाच्या पाण्याची गुणवत्ता निश्चित करता येईल. सांडपाण्याची संपूर्ण विल्हेवाट सुनिश्चित करण्यासाठी, सध्या आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये निर्माण होणारे सांडपाणी बीएमसीच्या सांडपाणी नेटवर्कमध्ये पंप केले जाते आणि भांडुप पंपिंग स्टेशनकडे वळवले जाते. बीएमसीने आयआयटी मुंबईला कॅम्पसमध्येच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा सल्लाही दिला आहे.
सांडपाणी पाईपलाईनची स्थापना हा पवई तलावाच्या पुनरुज्जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि तलावातील प्रमुख प्रदूषकांना वळवण्याच्या दिशेने केलेला हा एक प्रशंसनीय प्रयत्न आहे. तथापि, तलावाच्या परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी खऱ्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनाकरिता सर्व संबंधितांमध्ये कठोर अंमलबजावणी आणि पारदर्शक सहकार्याची आवश्यकता आहे .
पवई तलाव परिसर होणार अधिक प्रकाशमान
महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पवई तलावाच्या ठिकाणी आता प्रेमी युगूल आणि पर्यटकांवर विशेष लक्ष राहणार आहे. याठिकाणी तरुण तरुणींसह मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने येथील परिसर अधिक प्रकाशमान करून तिथे लखलखाट केला जाणार आहे. तसेच यापूर्वी बसवलेल्या सीसीटिव्ही कॅमेरांच्या देखभालीसाठी संस्था नियुक्त नसल्याने यातील कॅमेरांची नजर कमी झाली होती, त्यांची नजर तीव्र करण्यासाठी त्यांच्या देखभालीसाठी कंत्राटदाराची निवड केली आहे. यासाठी २ कोटी रु. खर्च केले जाणार आहेत.