मुंबई : जगभरात हंटाव्हायरसबाबत चिंता व्यक्त होत असून मुंबईतील आरोग्य तज्जांकडून उंदरांमुळे मुंबईतही हा संसर्ग पसरू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. आरोग्य प्रशासनाने वेळीच सतर्क होण्याची गरज असून शहरात मोठ्या प्रमाणावर पेस्ट कंट्रोल मोहीम राबवण्याची महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र अद्याप कोणतीही अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही.
मुंबईतील उंदरांची संख्या, जुन्या इमारती, गोदामे, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमुळे शहरात उंदरापासून संसर्गाचा धोका वाढू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र भारतात हंटाव्हायरसचे रुग्ण अत्यंत कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी, मुंबईत गोदामे, मॉल्स, जुनी इमारती, रुग्णालय परिसर आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उंदरांचा वावर आहे. त्यामुळे व्यापक पेस्ट कंट्रोल आणि उंदरांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे. मात्र कोविडनंतर रुग्णालयांची तयारी अधिक सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले.
जे. जे. रुग्णालयातील फुफ्फुसरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती मेश्राम यांनी सांगितले की, उंदरांची विष्ठा, लघवी किंवा लाळ यांच्यामुळे हा संसर्ग होऊ शकतो. उंदरांचा वावर असलेल्या ठिकाणी कोरडी झाडलोट किंवा व्हॅक्यूम क्लिनिंग टाळावे. त्याऐवजी ओल्या पद्धतीने स्वच्छता करावी, असा सल्ला त्यांनी दिला. उंदरांची बिळे बंद करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
हंटाव्हायरसची लक्षणे काय?
डॉक्टरांच्या मते, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थकवा ही सुरुवातीची लक्षणे सामान्य तापासारखीच असल्याने सुरुवातीला ओळखणे कठीण ठरू शकते. गंभीर अवस्थेत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
संसर्ग कसा होतो?
संक्रमित उंदीर किंवा घुशींची विष्ठा, लघवी किंवा लाळ वाळल्यानंतर हवेत मिसळते.
ही दूषित हवा किंवा धूळ श्वासावाटे फुप्फुसात गेल्याने मनुष्याला संसर्ग होतो.
काही विशिष्ट प्रजातींचा अपवाद वगळता, सामान्यत: हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.
या देशात रूग्ण आहेत
आशिया खंडात, विशेषतः चीन आणि दक्षिण कोरिया , रशिया, स्वीडन , फिनलंड उत्तर व दक्षिण अमेरिका आणि अर्जेंटिना या देशामध्ये रूग्ण आढळतात.
बंद आणि हवेशीर नसलेल्या जागांमध्ये उंदरांच्या विष्ठेतील सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात गेल्यास धोका वाढतो. गोदाम, बेसमेंट किंवा दीर्घकाळ बंद असलेल्या खोल्यांची साफसफाई करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र सामान्य नागरिकांसाठी हा संसर्ग सध्या दुर्मिळ आहे.डॉ. अमोल जयभाये, संसर्गजन्य तज्ज्ञ, नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल
मुंबईतील दाट लोकसंख्या, अस्वच्छता, पाणी साचणे आणि उंदरांचा वावर यामुळे अशा संसर्गांचा धोका वाढू शकतो. मात्र स्वच्छता, योग्य कचरा व्यवस्थापन आणि पेस्ट कंट्रोलमुळे धोका कमी करता येतो.डॉ. हरीश चाफळे, छातीविकार तज्ज्ञ ग्लेनईगल्स हॉस्पिटल्स.