मुंबई : गतिमंद मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास ताडदेव पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जागरुक तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्याचे नाव संजय राणे असून तो ताडदेव एल ए 2 विभागात सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत असल्याचे चौकशीत समोर आले.
ताडदेव आरटीओ परिसरात एक व्यक्ती पोलिसाच्या वेशात एका गतिमंद तरुणीला सोबत घेऊन फिरत असल्याचे काही स्थानिक तरुणांच्या निदर्शनास आले. संशय आल्यामुळे तरुणांनी या पोलिसावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. सदर पोलीस अधिकाऱ्याला याची भनक लागल्याने तो त्या मुलीला जवळच्या भाऊसाहेब हिरे उद्यानात घेऊन गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला.
एखादा पोलीस अधिकारी अशा प्रकारे अंगावर वर्दी असताना गतिमंद मुलीशी अश्लील चाळे करत असल्याचे लक्षात आल्यावर त्या तरुणांनी थेट पोलीस अधिकाऱ्यास सदर मुलगी कोण आहे असे विचारण्यास सुरुवात केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला असता तरुणांनी त्या पोलिस अधिकाऱ्याला चोप देत उद्यानाशेजारी असलेल्या पोलीस चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर आरोपीस गिरगाव कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.