Azad Maidan Protest Pudhari
मुंबई

Azad Maidan Protest: कीर्तनकार-शाहिरांना आझाद मैदानात वाद्ये नेण्यास पोलिसांची मनाई! विविध सांस्कृतिक संघटनांकडून पोलिसांसह सरकारचा निषेध

या आंदोलकांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी सुप्रसिद्ध किर्तनकार श्यामसुंदर सोन्नर महाराज व त्यांचे सहकारी टाळ मृदंग व अन्य वाद्य घेऊन आझाद मैदानात गेले होते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आझाद मैदानात आंदोलने, सभा, निदर्शने करणाऱ्या संस्थांमध्ये जनजागृती तसेच शाहिरी गीते, पोवाडे, पथनाट्ये किंवा इतर सांस्कृतिक माध्यमातून जनजागृती करत आंदोलकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी वाद्यांचा वापर केला जातो, मात्र आता आझाद मैदानात आंदोलने करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, संघटनांनी येथे डफ किंवा वाद्ये वाजवू नयेत, असा फतवा काढण्यात आला आहे.

सी.आय.टी.यु. या कामगार संघटनेच्या पुढाकाराने, महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, मोलकरणी, बांधकाम कामगार, कंत्राटी व असंघटित कामगारांच्या समस्या व न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात गेलेल्या कीर्तनकार आणि कार्यकर्त्यांना आझाद मैदानात वाद्य मैदानात नेण्यास पोलिसांनी मज्जाव केला.

सी.आय.टी.यु. कामगार संघटनेच्या पुढाकाराने, महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, मोलकरणी, बांधकाम कामगार, कंत्राटी व असंघटित कामगारांच्या समस्या व न्याय मागण्यांसाठी 1-3 जूनपर्यंत मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होते.

या आंदोलकांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी सुप्रसिद्ध किर्तनकार श्यामसुंदर सोन्नर महाराज व त्यांचे सहकारी टाळ मृदंग व अन्य वाद्य घेऊन आझाद मैदानात गेले होते.

चळवळीतील शाहीर आपले डफ घेऊन मैदानात आले असताना, तेथील पोलिसांनी त्यांना वाद्ये घेऊन जाण्यास मनाई केली. आम्ही वाद्याशिवाय किर्तन, गाणी कशी गाऊ शकतो, असा पोलिसांना सवाल केला.

या बाबतीत अधिकृत पत्र, आदेश आहे का असा प्रश्न केला असता, त्याचे पोलिसांनी समाधानकारक उत्तर न देता, “आम्हाला सरकारचा वरून ‌‘आदेश‌’ आहे”, एवढेच सांगितले. आणि सर्व वाद्ये पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतली व शाहीर, किर्तनकारांना मैदानात प्रवेश दिला.

पोलीस व सरकारच्या या हुकुमशाही वृत्तीचा

व कलावंताच्या या मुस्कटदाबीचा श्यामसुंदर सोन्नार महाराज, आंदोलनाचे आयोजक व सीटू कामगार संघटनेचे नेते राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत, लोक सांस्कृतिक चळवळचे सेक्रेटरी सुबोध मोरे, जनवादी लेखक संघाचे सेक्रेटरी मुख्तार खान यांच्यासह अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

ज्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लोकशाहीर कॉ.अमर शेख व आंबेडकरी शाहीर वामनदादा कर्डक यांनी डफावर थाप मारत शिवाजी पार्कपासून ते आझाद मैदानापर्यंत, रस्त्यावर पोवाडे, गाणी गात सारा महाराष्ट्र जागा केला व वैचारिक प्रबोधन केले. आज तोच डफ व वाद्ये “आझाद मैदानात” वाजवण्यास शासन व पोलीस मनाई करीत आहे, ही संतापजनक व चीड आणणारी बाब आहे. वारकरी, किर्तनकारांवर कलावंतांना वाद्ये वाजवण्याची मनाई करणे हा वारकरी संप्रदायाचा, विद्रोही संत कबीर, विद्रोही संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर जनाई, चोखोबा आदींचा अपमान आहे.
- सुबोध मोरे, सेक्रेटरी, लोक सांस्कृतिक चळवळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT