

निसार अली
मालाड: मालाड (पूर्व) येथील पुष्पा पार्क परिसरात गुरुवारी (४ जून) सकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ओला कारचालकाचा मृत्यू झाला. बेस्टच्या वडाळा आगारातील मार्ग क्रमांक ४४० वरील बस वडाळा डेपोकडे परत जात असताना हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ओला कार रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी कारचालक वाहन स्वच्छ करत असताना मागून आलेल्या बसने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सदर बस ही मेटेश्वरी (MUTSPL) कंपनीमार्फत चालविण्यात येत असून बसवरील चालक क्रमांक ०२४३३५ आणि वाहक क्रमांक १२४३८९ असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच दिंडोशी आगार व्यवस्थापक तसेच संबंधित अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.