मुंबई : पत्नीच्या जीवनयात्रा संपवल्याप्रकरणी अमोल भाऊलाल राऊत या पोलीस पतीविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच अमोल हा पळून गेला. अमोल हा राज्य राखीव पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असून त्याचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचे बोलले जाते.
याच संबंधातून होणाऱ्या छळाला कंटाळून त्याची पत्नी सारिका अमोल राऊत हिने जीवन संपवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सारिका आणि अमोल हे मूळचे नाशिकचे रहिवासी आहेत. नऊ वर्षांपूर्वी अमोलचे सारिकासोबत लग्न झाले होते. त्यानंतर ती त्याच्यासोबत गोरेगाव येथील घरी राहत होती. लग्नानंतर सात वर्षे सुरळीत गेले, मात्र गेल्या दोन वर्षांपासून अमोलचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले होते.
या प्रेमसंबंधावरुन त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. अमोल तिचे सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. याबाबत तिने तिच्या कुटुंबियांना माहिती दिली होती. त्यानंतर तिचा भाऊ समीर पांडुरंग सोनावणे याने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. आठ दिवसांपूर्वी अमोल हा कामानिमित्त पुण्याला गेला होता. त्यावेळी सारिकाने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती.