Police Assault Case pudhari photo
मुंबई

Mumbai News : मालाड हॉटेल वादप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

मारहाणीचा आरोप सिद्ध न झाल्याने सत्र न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई :कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले. पोलिसाला शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या गंभीर आरोपांखाली दाखल केलेल्या खटल्यात दोषत्व सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने आरोपीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी हा निकाल दिला. आरोपी मोहम्मद हमजा मोहम्मद ताज फारुकी (कुलाबा, मुंबई) याच्याविरोधात बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, १५ एप्रिल २०१८ रोजी पहाटे १.४० वाजता पोलीस शिपाई संजय फडतरे आणि पोलीस निरीक्षक अरविंद चांदनशिवे हे पीटर-१ मोबाईल व्हॅनवरून गस्त घालत होते.

मालाड पश्चिमेकडील फ्रायडे गल्ली, चिंचोली बंदर जंक्शनसमोरील कुतुझ इराणी हॉटेलसमोर गर्दी असून वाहतुकीला अडथळा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल बंद करण्यास सांगितले असता आरोपीने 'हा माझ्या धंद्याची वेळ आहे, मी हॉटेल बंद करणार नाही' असे म्हणत शिवीगाळ केली, तक्रारदाराच्या गणवेशाची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली आणि धमकी दिली, असा आरोप होता.

पाच साक्षीदार तपासले

  • सुमारे साडेसात वर्षे चाललेल्या या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. मात्र, न्यायालयाने पुरावा अपुरा आणि संशयास्पद असल्याचे निरीक्षण नोंदवले.

  • तक्रारदार पोलीस त्यावेळी कर्तव्यावर होते हे सिद्ध करण्यासाठी ड्युटी वाटपाची प्रत सादर करण्यात आली. मात्र, त्यावर फक्त बक्कल क्रमांक होता, नाव नव्हते. तक्रारदारानेही आपला बक्कल क्रमांक साक्षीत सांगितला नाही.

  • तसेच ती प्रत देणारे अधिकारी साक्षीला आले नाहीत आणि मूळ कागदपत्राशी पडताळणीही झाली नाही, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले. आरोपीवर ठेवलेले आरोप संशयापलीकडे सिद्ध होत नसल्याने न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपीला निर्दोष मुक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT