पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बुधवारी महाराष्ट्रातील ७,६४५ कोटींहून अधिक विविध प्रकल्पांच्या कामांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. (Source : DD News)
मुंबई

महाराष्ट्राला १० वैद्यकीय महाविद्यालयांची भेट, पीएम मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन

Maharashtra | महाराष्ट्रातील ७,६४५ कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बुधवारी महाराष्ट्रातील (Maharashtra) ७,६४५ कोटींहून अधिक विविध प्रकल्पांच्या कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन झाले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आणि शिर्डी विमानतळाच्या कामांचे भूमीपूजन, नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन यांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्राला मिळाली १० वैद्यकीय महाविद्यालयांची भेट

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज महाराष्ट्राला १० वैद्यकीय महाविद्यालयांची भेट मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरच्या आणि शिर्डी विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारती प्रकल्पाचेही भूमीपूजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मेट्रोचा आणि विमानतळांचा विस्तार केला जात आहे. राज्यात पायाभूत सुविधा, सौरऊर्जा आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध योजना सुरू केल्या जात आहेत. सर्वात मोठ्या वाढवण कंटेनर बंदराची यापूर्वीच पायाभरणी झाली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.'' काँग्रेस सरकारच्या काळात विविध क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात एकाचवेळी १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु

केंद्र सरकारने नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांत ९०० नी वाढ होत आहे. एकूण ३५ महाविद्यालयात प्रतिवर्ष ४,८५० एमबीबीएस जागा उपलब्ध होत आहेत. मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा १० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आज पीएम मोदींच्या हस्ते झाले. एकाचवेळी १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणे ही गौरवास्पद बाब असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागपूर - विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे ७ हजार कोटी रुपये आहे. येथे सर्व आकारांच्या विमानांसाठी योग्य स्वतंत्र संचालनासह दोन समांतर धावपट्टी, विद्यमान धावपट्टीचे विस्तारीकरण केले जात आहे. तसेच नवीन धावपट्टीची निर्मिती, दरवर्षी १४ दशलक्ष प्रवाशांच्या हाताळणीसाठी ३ लाख चौ.मी.च्या नवीन टर्मिनल इमारतीचा विकास, अंदाजे ९ लाख मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन कार्गो कॉम्प्लेक्सचा विकास करण्यात येत आहे.

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन आज करण्यात आले. विस्तारित टर्मिनल इमारतीमुळे शिर्डीमधील स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT