मुंबई : स्वातंत्र्यानंतर प्रथमच हरियाणात (Haryana election results) सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळविण्याचा चमत्कार भाजपने घडविला आहे. अग्निवीर आणि महिला खेळाडूंच्या विषयावर खोटे बोलून रान पेटविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला. जातीपातीचे राजकारण करत समाजात फूट पाडली; मात्र काँग्रेसच्या या सर्व नरेटिव्हला जनतेने थेट उत्तर दिले आहे. हरियाणात आज जे घडले तेच महिनाभरात महाराष्ट्रात (Maharashtra election 2024) घडलेले दिसेल. लोकसभा निवडणुकीनंतरच्या विजयाची पाहिली सलामी हरियाणाने दिली आहे, तर दुसरी सलामी महाराष्ट्र देणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे.
या विजयाने आम्ही मातणार नसून या विजयामुळे आम्ही अधिक मजबूत होणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. नरेटिव्हने एखादी निवडणूक जिंकता येते. मात्र, लोकांची सेवा करूनच अनेक निवडणुका जिंकता येतात हे या निकालांनी दाखवून दिले आहे. लोकसभेत भाजप विरोधकांसमोर नव्हे, तर नरेटिव्हसमोर हरला. आता जनताच या नरेटिव्हला थेट उत्तर देत आहे. महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासूनच भाषण लिहन बसले होते. भाजप हरेल अशी स्वप्ने बघणारे तयारीत बसले होते. रोज सकाळी वाजणारा भोंगाही तयारीत होता. त्या सर्वांना जनतेने उत्तर दिल्याचे सांगत फडणवीसांनी विरोधकांना फटकारले.
आजच्या निकालाचा, विजयाचा हाच अन्वयार्थ आहे की, जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणासोबत आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते बनलेले राहुल गांधी रोज नवीन नाटक करत आहेत. त्यांच्या नाटकांना, भूलथापांना आता कोणीच बळी पडणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.