मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या महासत्तेच्या प्रवासात नैसर्गिक भागीदार असलेल्या ब्रिटनची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. फिनटेकचा उपयोग सामान्य नागरिकांच्या आयुष्यात समृद्धीसाठी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्याचवेळी आमचे हे पाऊल मदत म्हणून नव्हे, तर सक्षमीकरण असल्याचे सांगून एका परिने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टोलाच लगावला.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक फिनटेक महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीआ स्टार्मर सहभागी झाले होते. आपल्या शिष्टमंडळासह स्टार्मर या महोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे आभारही मानले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दशकभरात भारताने तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक वापर प्रत्येक क्षेत्रात केला. यात बँकिंग समावेशन, आधारला यूपीआयची जोड देऊन, तंत्रज्ञान केवळ सुविधा नाही, तर समानतेचे साधन असू शकते हे जगासमोर सिद्ध केल्याचे मोदी यांनी सांगितले. भारतात डिजिटल व्यवहार आता नित्याचा झाला आहे, याचे श्रेय त्यांनी जॅम ट्रिनिटी अर्थात जनधन, आधार आणि मोबाईलला आहे. केवळ यूपीआयद्वारे दरमहा 20 अब्ज व्यवहार होतात, त्यांचे मूल्य 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जगातील शंभर व्यवहारांपैकी 50 डिजिटल व्यवहार एकट्या भारतात होतात, असे मोदी यांनी सांगितले.
भारताच्या डिजिटल स्टॅकविषयी जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. त्यांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, आधार सक्षम मोबदला व्यवस्था, भारत बिल पेमेंट व्यवस्था, भारत-क्यूआर, डिजिलॉकर, डिजियात्रा, आणि गव्हर्नमेंट ई-बाजारपेठ या प्रमुख घटकांना भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा बनले आहेत.
इंडिया स्टॅक ही केवळ भारताच्या यशाची गाथा नाही, तर जगासाठी, विशेषतः ग्लोबल साऊथमधील देशांसाठी आशेचा किरण आहे. डिजिटल नवकल्पनांद्वारे भारत जागतिक स्तरावर डिजिटल सहकार्य आणि डिजिटल भागीदारी वाढवू इच्छितो. भारत आपले अनुभव आणि मुक्त स्रोत प्लॅटफॉर्म दोन्ही जागतिक सार्वजनिक वस्तू म्हणून जागतिक वापरासाठी मुक्त करत आहे.
ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर म्हणाले, भारतासोबतची भागीदारी दोन्ही देशांच्या परस्पर प्रगतीला चालना देणारी असून ही सामायिक प्रगतीच्या नव्या युगाची सुरुवात आहे. यासाठी दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापक आर्थिक आणि व्यापार करारातून निर्माण होणार्या नव्या संधींवर भर दिला जाणार आहे. भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जलदगतीने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी भारत आहे.
भारताच्या लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्या 25 वर्षांखाली वय असणार्यांची आहे. या देशाची ऊर्जा आणि क्षमता विशेषतः मुंबईत स्पष्टपणे दिसते. तसेच, जेव्हा ही क्षमता ब्रिटन सोबत एकत्र येईल, तेव्हा यूके फिनटेक नवकल्पनांसाठी आणखी उत्तम केंद्र बनवता येईल. डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा क्षेत्रात गुंतवणूक करत आहोत. तसेच जागतिक प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी जलद परवाना प्रक्रिया आणि नवीन व्हिसा मार्ग सुरू करत आहोत. व्यवसाय व रोजगार यासाठी फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
समजदार को इशारा काफी हैं
जगातील 25 हूनअधिक देश त्यांच्या सार्वभौम डिजिटल ओळख प्रणाली तयार करण्यासाठी त्याचा वापर करत आहे. भारत तंत्रज्ञान केवळ सामायिक करत नाही, तर इतर राष्ट्रांना ते विकसित करण्यासाठी मदतही करत आहे, असेही त्यांनी सांगितले. ही डिजिटल मदत नव्हे, तर डिजिटल सक्षमीकरण आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. त्याचवेळी जगाला केलेली ही मदत नाही, नाहीतर काही लोकांना सवय आहे मदत केली म्हणायची, असा टोला मोदींनी लगावला. तेव्हा ‘समजदार को इशारा काफी हैं’ म्हणत, मोदी यांनी न बोलताही आपला इशारा ट्रम्प यांच्याकडे असल्याचे अधोरेखित केले.