

मुंबई : मुंबई अग्निशामक दलामध्ये सुमारे 15 ते 17 वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आलेल्या इव्हिको मॅगिरस या कंपनीच्या टर्न टेबल लॅडरसह असलेल्या वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढत आहे. येणार्या तीन वर्षांसाठी चार वाहनांच्या देखभालीचा खर्च 5 कोटी 67 लाख रुपयांवर जाणार असून या यासाठी कंपनीचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील जनतेच्या जिवितासह त्यांच्या संपत्तीचे आगीपासून व अन्य दुर्घटनेपासून संरक्षण करण्याचे बंधनकारक कर्तव्य अग्निशमन दलामार्फत पार पाडले जाते. याकरीता मुंबई अग्निशमन दलाचे 35 अग्निशमन केंद्रे व 300 पेक्षा अधिक वाहनांचा ताफा आहे. इमारत पडझड, आगी, पुर परिस्थिती, जिवित व वित्तहानी या आपत्कालिन परिस्थितीमध्ये मदत कार्य पोचवण्यात येते. उत्तुंग इमारतीत लागणार्या भीषण आधीच्या वेळी उंच शिडी असलेल्या बहुउद्देशीय वाहनांचा उपयोग केला जातो. अशा प्रकारची वाहने अग्निशमन दलामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वापरत असून त्यांची सेवा व उपयोग अत्यंत समाधानकारक आहे.
अग्निशमन दलात महत्त्वाची कामगिरी बजावणार्या या वाहनांच्या देखभालीसाठी तज्ज्ञ कंपनीची नियुक्ती करण्यात येते. 2021 ते 2024 या तीन वर्षात टर्न टेबल लॅडर गाड्यांच्या देखभालीसाठी 2 कोटी 94 लाख 56 हजार रुपये खर्च करण्यात आला होता. परंतु या गाड्यांच्या मेंटेनन्सचा खर्च येणार्या तीन वर्षांसाठी वाढला आहे. या गाड्यांसाटी आता खर्च 5 कोटी 67 लाख रुपयांवर जाणार असल्याचे महापालिका अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.