मुंबई : गेल्या काही वर्षांत देशभरात फार्मसी महाविद्यालयांची भरमसाठ वाढ झाली आहे.औषध उद्योग हे सदैव तेजीत असणारे क्षेत्र मानले जात असले तरी फार्मसी शिक्षणाच्या बाबतीत गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांची संख्या वाढल्याने अनेक महाविद्यालयांच्या जागा रिक्त राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच तब्बल सुमारे 30 टक्के जागा दरवर्षी रिकाम्या राहतात, अशी माहिती शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
फार्मसीमध्ये करियर करण्यासाठी मागणी अद्याप टिकून आहे. औषधांची गरज सदैव राहणारच असल्यामुळे हे क्षेत्र सनशाईन सेक्टर म्हणून ओळखले जाते. कोविड काळातही औषध उद्योगाने मंदीला तोंड दिले नाही; उलट मागणीत वाढ झाली. तरीही फार्मसी शिक्षणात असंतुलन निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे महाविद्यालयांची अतिवाढ. फार्मसीला सातत्याने मागणी असली तरी कॉलेजेसची संख्या कृत्रिमरीत्या वाढवण्यात आली. अनेक संस्थांनी आर्थिक नफा लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू केली. यामुळे पुरवठ्याचा तोल बिघडला,असे मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनी सांगितले.
नोकरीच्या संधींचे चित्रही गोंधळात टाकणारे आहे. बी. फार्म. व डी. फार्म. झालेल्या विद्यार्थ्यांना फार्मा मार्केटिंग, रुग्णालयातील फार्मासिस्ट किंवा औषध दुकान चालवण्यासारख्या संधी आहेत. डिजिटायझेशनमुळे नव्या प्रकारच्या नोकऱ्याही उदयास येत आहेत. तथापि, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने सर्वांना समाधानकारक नोकरी मिळत नाही. जॉब्स वाढत असले तरी यातून आउटपुट असे नाही त्यापैक्षा म्हणजे पास होणारे विद्यार्थी त्याहूनही जास्त आहेत, अशी खंत तज्ञांनी व्यक्त केली.
महाविद्यालयांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही त्याचा परिणाम जाणवतो. पगार कमी असल्याने पात्र शिक्षक टिकत नाहीत. स्थिर अध्यापक वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही दाखल केले जाते, असा आरोपही आहे. शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. अनेक महाविद्यालये फक्त कागदोपत्री कार्यरत आहेत, अशी टीका फार्मसी महाविद्यालयातील एका प्राचार्यांनी केली.
फार्मसी शिक्षणाची सद्यस्थिती ही व्यवस्थेतील असंतुलनाचे दर्शन घडवते अटेंडन्स नसले तरी महाविद्यालयांना चालत आहे. ऍडमिशन घ्यायची आणि मग महाविद्यालयामध्ये जायचे नाही, डिप्लोमा-डिग्री मिळते असेही आहे.
मान्यता मिळवण्याच्या निकषांचे काटेकोर पालन, शिक्षकांचे वेतन, विद्यार्थी उपस्थिती यांसारख्या मुद्द्यांना तातडीने हाताळणे आवश्यक आहे. अन्यथा फार्मसी शिक्षणातील गुणवत्ता राखणे कठीण होईल, अशी धक्कादायक माहिती एका नामवंत महाविद्यालयांती शिक्षकांनी दिली. (उत्तरार्ध)
पहिल्या वर्षाचे सत्र सहा महिन्यांचे
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यता उशिरा मिळाल्यामुळे यंदाही राज्यातील फार्मसी पदविका अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाचे शैक्षणिक सत्र केवळ सहा महिन्यांचे असणार आहे. वार्षिक परीक्षा 30 एप्रिल 2026 पासून होणार आहे. प्रवेश उशिराने झाल्याने अभ्यासक्रमाची सुरुवात 24 ऑक्टोबरपासून झाली असून, 18 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे. सामान्यतः हे सत्र नऊ ते दहा महिन्यांचे असते; यंदा विद्यार्थ्यांना पाच-सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
या कालावधीत तीन अंतर्गत परीक्षा होणार आहेत. पहिली 15 ते 19 डिसेंबर 2025, दुसरी 9 ते 14 फेब्रुवारी 2026 आणि तिसरी 6 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान. अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा 20 ते 25 एप्रिल 2026, तर थिअरी परीक्षा 30 एप्रिलपासून सुरू होणार आहे. यंदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे 1 ते 3 डिसेंबर दरम्यान संस्था पातळीवर होणार आहे, तर 4 ते 5 डिसेंबर आरबीटीई पातळीवर होणार आहे. उन्हाळी परीक्षेसाठी अर्जाची मुदत 2 ते 12 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
महिने कमी पण शुल्क तेवढेच
केवळ सहा महिने अभ्यासक्रम शिकवला असताना मात्र शुल्क मात्र वर्षाचे घेतले जात आहे. अतिरिक्त तास कमी वेळेत जास्त अभ्यास होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम इतक्या कमी वेळात पूर्ण करणे कठीण होईल, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांनी दिली. दरवर्षी पीसीआयकडून मान्यता उशिरा मिळाल्याने अशा अडचणी निर्माण होतात,पीसीआयच्या प्रक्रियेत सुधारणा न झाल्यास विद्यार्थ्यांचे दरवर्षी असेच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.