मुंबई : मध्य रेल्वे मार्गात कल्याणहून सकाळी सीएसएमटी येथे पोहोचलेल्या जलद लोकलच्या महिला प्रथम श्रेणी डब्यात जागेवरून दोन गटांतील महिला प्रवाशांमध्ये गुरुवारी मोठा वाद झाला. या वादात एका महिलेने दुसऱ्या महिला प्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याची घटना घडली आहे. या प्रकणात कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही महिलांना जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
कल्याण येथून सीएसएमटीसाठी सकाळी ८.३३ वाजता सुटलेल्या एन-९ फास्ट लोकलच्या महिला प्रथम श्रेणी डब्यात ही घटना घडली. काही महिला प्रवासी डोंबिवली ते कल्याण असा परतीचा प्रवास करून आधीच जागा मिळवतात. त्यानंतर सीएसएमटीकडे सीट मिळवून बसून प्रवास करतात. त्यामुळे कल्याण स्थानकावरून चढणाऱ्या महिला प्रवाशांना बसण्यासाठी सीट मिळत नाही.
याच कारणावरून डोंबिवली–कल्याण फेरी मारून जागा अडवणाऱ्या महिला आणि कल्याणहून सीएसएमटीकडे प्रवास सुरू करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये वाद झाला आहे. हा वाद वाढल्यानंतर डोंबिवली- कल्याण गटातील एका महिलेने आपल्या पिशवीतून पेपर स्प्रे काढून कल्याणहून चढलेल्या महिला प्रवाशांवर फवारला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सीएसएमटी स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल आणि कल्याण रेल्वे पोलीस यांनी संबंधित डब्यात संयुक्त चौकशी केली. आणि तक्रारदार महिला आणि पेपर स्प्रेचा वापर करणाऱ्या महिलेला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सीएसएमटी जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे.