Sting Operations Pudhari
मुंबई

Sting Operations: ११८ स्टिंग ऑपरेशन्स, फक्त १३ कारवाया! गर्भलिंग तपासविरोधी पथकाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

या पथकाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

अदिती कदम

मुंबई: गर्भातील मुलींच्या हत्या रोखण्यासाठी प्रशासनाने स्थापन केलेल्या विशेष पथकाच्या धाडींची आकडेवारीच आता संशय निर्माण करू लागली आहे. मोठ्या गाजावाजात आणि गोपनीय माहितीच्या आधारे ११८ स्टिंग ऑपरेशन करून अवघ्या १३ कारवाया यशस्वी ठरल्या असून तब्बल १०५ प्रकरणांत पथकाला अक्षरशः रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या पथकाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

गर्भलिंग तपास आणि मुलींच्या गर्भहत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अचानक धाडी हे प्रभावी शस्त्र मानले जाते. मात्र प्रत्यक्षात धाडींचे प्रमाण वाढत असले तरी ठोस पुरावे, कारवाई आणि गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने संपूर्ण मोहिमेची परिणामकारकताच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

विशेष म्हणजे अनेक वेळा पथक धाड टाकण्यासाठी पोहोचण्यापूर्वीच संबंधितांना माहिती मिळत असल्याची चर्चा आरोग्य वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे स्टिंग ऑपरेशन “फिक्स” तर नसतात ना, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी कागदपत्रांची केवळ औपचारिक तपासणी करून पथक परतल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.

दुसरीकडे प्रशासन मात्र या आरोपांचे खंडन करत आहे. “स्टिंग ऑपरेशन उद्देश केवळ गुन्हे पकडणे नसून बेकायदेशीर प्रकारांना प्रतिबंध घालणे हा देखील आहे,” असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. सातत्याने धाडी पडत असल्याने अनेक संशयित केंद्रांनी सावध भूमिका घेतल्याचेही सांगितले जात आहे.

तथापि, मुलींच्या घटत्या जन्मदराचा प्रश्न गंभीर बनत असताना केवळ कागदी कारवाया आणि धाडसत्र पुरेसे नसल्याची भावना सामाजिक संघटनांतून व्यक्त होत आहे. गुप्त माहितीचे मजबूत जाळे, बनावट ग्राहकांच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन आणि दोषींवर जलद कारवाई याशिवाय या गुन्ह्यांवर अंकुश बसणार नाही, अशी मागणी पुढे येत आहे.

आकडेवारी बोलकी

एकूण स्टिंग ऑपरेशन ११८

यशस्वी कारवाया १३

निष्फळ धाडी १०५

यशाचे प्रमाण ८%

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT