मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेला वेग आला असून, आतापर्यंत 2 लाख 10 हजारांहून अधिक अर्ज ‘फी भरून निश्चित’ झाले आहेत.
एमएचटी-सीईटी या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थी अर्ज करतात. अजूनही अर्ज करण्यास अंतिम मुदत आहे. आतातर्यंत तब्बल 1 लाख 20 हजार 795 उमेदवारांनी अंतिम अर्ज केले आहेत. उच्च शिक्षणातील बी.एड. (सामान्य व विशेष) अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी आतापर्यंत 29 हजार 520 उमेदवारांनी अर्ज निश्चित केला आहे. त्याचप्रमाणे एलएलबी (3 वर्षे) या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 20 हजार 521 अर्ज अंतिम झाले असून, विधी शिक्षणाकडे वाढता कल असल्याचे आकडे सांगतात.
व्यवस्थापन शिक्षणात एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमासाठी यंदा एकदाच सीईटी होणार आहेत. यासाठी आतापर्यंत 15 हजार 91 अंतिम अर्ज नोंदवले गेले आहेत. तर एलएलबी (5 वर्षे) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या सीईटीसाठीही 9 हजार 321 उमेदवारांनी अर्ज निश्चित केले आहेत.
संगणक क्षेत्रातील एमसीए अभ्यासक्रमासाठीही 6 हजार 233 अर्ज झाले आहेत. बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी एकत्रितपणे 4 हजार 709 अर्ज अंतिम झाले आहेत. शिक्षक शिक्षणाशी संबंधित एमएड आणि एमपीएड अभ्यासक्रमांनाही अर्ज करत आहेत. येत्या काही दिवसांत अंतिम अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता सीईटी कक्षाकडून व्यक्त केली जात आहे.