Parth Pawar Controversy Impact on Mahayuti
मुंबई: कार्यकर्ता असो वा पत्रकार.... ऐरवी सातत्याने खडेबोल सुनावणारे अजित पवार गुरुवारी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळत होते. दुपारनंतर शेवटी अजित पवारांनी मौन सोडले आणि पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहारावर पहिली प्रतिक्रिया दिली. ऐरवी फ्रंटफुटवर खेळणाऱ्या अजित पवारांना आज अवघ्या महाराष्ट्राने काहीसे बॅकफुटवर खेळताना बघितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जमिनीचा वाद समोर आल्याने अजित पवार हे पुन्हा अडचणीत आले आहेत.
अजित पवार आणि वाद
अजित पवारांची राजकीय कारकीर्द वादग्रस्त झाली ती भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे. सिंचन घोटाळा आणि त्यानंतर साखर कारखान्यांच्या विक्रीचा घोटाळा समोर आला. या घोटाळ्यांमधून क्लिन चीट मिळावी यासाठी ते भारतीय जनता पक्षासोबत गेले ही चर्चा आता नवीन राहिलेली नाही.
पार्थ पवारांमुळे अजित पवार किती वेळा अडचणीत आले?
पार्थ पवार यांच्यामुळेच अजितदादा लोकसभा निवडणुकीत अडचणीत आले होते. पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसने अजित दादांकडे सोपवली होती. त्या निवडणुकीत हार पत्करावी लागल्यानंतर अजितदादा मुलालाही वाचवू शकत नाही. अशी चर्चा सुरू झाली होती आता याच मुलाने पुन्हा एकदा सध्या तरी एका घोटाळ्यात स्वतःला गुंतवून घेतल्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निवडणुकीच्या तोंडावरती हा प्रश्न उपस्थित झाला असल्यामुळे महायुतीच्या कामाच्या प्रतिमेवर परिणाम होणार हे निश्चित आहे.
वडिलांनी फटकारलं, आत्याने कवटाळलं याचा अर्थ काय?
महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी पक्षनेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत असतानाच हा नवा घोटाळा समोर आला आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांनी भाचा पार्थ पवार याची कोणतीही चूक नसल्याची भूमिका घेत पवार कुटुंबात सुरू असलेल्या राजकारणामध्ये एक वेगळाच दृष्टिकोन आणला आहे. वडिलांनी मुलाला फटकारले असताना आत्याने त्याला कवटाळून घेणे हे कमालीच्या गुंतागुंतीचे संबंध झालेल्या पवार घराण्यात अजून एक वात पेटवू शकेल.
खडसेंबाबत जो न्याय तेच निकष अजित पवारांसाठी लागू होणार?
पार्थ याच्या वर्तनाबद्दल गेले कित्येक दिवस काळजी व्यक्त केली जात होती. त्याचा छोटा भाऊ जय हा मात्र उत्तम रीतीने वागतो त्याला राजकीय समज आहे आणि तो सर्व घटनांच्या दूर असतो असे बोलले जाते. अजितदादा यांनी स्वतःची कारकीर्द धोक्यात आणताना किंवा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण करत वादग्रस्त केली असताना मुलाचे पुढे काय हा प्रश्नही निर्माण झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या बद्दल असा वाद निर्माण झाला तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला गेला होता आता या प्रकरणाचे पडसाद महायुतीतील परस्पर संबंधांवर होणार आहे का ते बघायचं.