मुंबई : 'लालबागच्या राजासमोर दोघेही उभे राहिले. तिने डोक्यावर ओढणी घेतली. दर्शन घेण्यापूर्वी त्याने खिशातून पैसे काढले आणि तिच्या हातात दिले. मग दोघांनीही दानपेटीत पैसे टाकले...'
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या उभयतांचे हे वर्णन असावे, असे कोणालाही वाटणे साहजिकच आहे. पण तसे अजिबात नाही. हे वर्णन आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे.
गणेशोत्सवात लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गर्दी असते. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीही बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पोहोचली होती. मात्र तिचा पार्थ पवारांबरोबरचा हा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जॅकलिनने लालबागचा राजाचे चरणस्पर्श केले. तिथे आरती सुरू होती. तेव्हा पार्थ पवार यांनी आपल्या खिशातून काही नोटा काढल्या आणि जॅकलिनला दिल्या. पार्थ पवार यांनी आपल्या हातातील नोटा दानपेटीत टाकल्यानंतर जॅकलिनने पार्थ यांच्याकडून घेतलेल्या नोटा दानपेटीमध्ये टाकल्या. त्यानंतर जॅकलिन व पार्थ पवार बाप्पाचे चरणस्पर्श करून निघून गेले. पार्थ व जॅकलिन यांच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.