मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील बहुतांश जागा मेट्रो रेल्वेखाली गेली आहे. त्यामुळे वाहने पार्किंगसाठी जागाच शिल्लक नाही. सध्या प्रशासकीय राजवट असल्याने पालिकेत नगरसेवकांचा राबता कमी आहे. मात्र निवडणुकीनंतर पार्किंगचा पेच निर्माण होणार आहे.
पूर्वी महापालिका मुख्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात नगरसेवकांच्या गाड्या पार्किंग केल्या जात होत्या. परंतु मेट्रो रेल्वेचे अनेक प्रवेशद्वार या जागेतून बाहेर येत असल्यामुळे आता या जागेवर पार्किंग करणे शक्य होणार नाही. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयाजवळील पदपथावरही मेट्रो रेल्वेचे प्रवेशद्वार झाले आहे.
227 नगरसेवकांसह 5 नामनिर्देशित नगरसेवक महापालिका मुख्यालयात येतात. यातील बहुतांश नगरसेवकांकडे गाड्या असल्यामुळे बैठकीच्या वेळी किमान 200 पेक्षा जास्त गाड्या मुख्यालय परिसरात पार्क केल्या जातात. या गाड्या महापालिका मुख्यालयासह महापालिका जिमखाना समोरील मोकळ्या जागेत व काही गाड्या पदपथावर बैठक संपेपर्यंत पार्क केल्या जात होत्या. परंतु आता या जागाच शिल्लक न राहिल्यामुळे नगरसेवकांच्या पार्किंगची समस्या कशी सोडवणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे.
किमान तिनशे गाड्यांचे हवे पार्किंग
महापौर मुंबई महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या गाड्यांना मुख्यालयाच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यात पार्किंगची व्यवस्था आहे. तर अन्य अधिकाऱ्यांच्या गाड्या दोन्ही इमारतीच्यामध्ये तर काही आजूबाजूला उभ्या केल्या जातात. या गाड्यांची संख्या सुमारे 100 च्या आसपास आहे. त्याशिवाय गाड्या नगरसेवकांच्या येणाऱ्या महापालिका मुख्यालयात येणार असल्यामुळे पालिकेला तीनशे वाहने उभे राहतील, एवढी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
परिसरात जागेचा शोध
महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात जागेचा शोध सुरू असून मेट्रो सिनेमा, आझाद मैदानचा काही परिसर, जीपीओ, खादी ग्रामोद्योग येथील काही जागा राखीव करावी लागणार आहे. त्यामुळे येथील जागेचा शोध सध्या सुरू असल्याची सांगण्यात येत आहे.