मुंबई : बहुप्रतीक्षित पनवेल - कर्जत दरम्यान नवा उपनगरीय रेल्वे मार्ग डिसेंबर-२०२६ पर्यंत पूर्ण होणाच्या मार्गावर आहे. या मार्गावर पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वेकडून सुरू आहे. या मार्गावर पहिल्या टप्प्यात दिवसाला ५० लोकल धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर पनवेल-कर्जत प्रवासासाठी लागणारा अधिकचा कालावधी कमी होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी - ३ अंतर्गत २,७८२ कोटी रुपयांचा पनवेल - कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या या प्रकल्पाचे जवळपास ९९ टक्के कामे पूर्ण झाले आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पनवेल- कर्जत दरम्यानची पर्यायी लोकल वाहतूक उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचा मोठा फायदा मुंबईसह नवी मुंबई, कर्जतसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.
या मार्गात ५ रेल्वे स्थानके...
सध्या पनवेल - कर्जतसाठी थेट उपनगरी रेल्वे जोडणी नसल्याने प्रवाशांना अधिक वेळ खर्च करून प्रवास करावा लागत होता. आता या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असणार आहेत. तसेच या मार्गिकेवर तीन बोगदे आहेत. त्याची एकूण लांबी ३.१६४ किमी आहे. यापैकी २.६२५ किमी लांबीचा वावले बोगदा सर्वांत लांब बोगदा आहे. तसेच ५ उड्डाणपूले, १६ भुयारी मार्ग आहेत.
या मार्गावर नवीन पनवेल स्थानक कार्यान्वित झाले आहे. तसेच चिखले आणि पोयंजे स्थानकांची इमारत पूर्ण झाली आहे. शेवटच्या कर्जत स्थानकांवर फलाट, सर्क्युलेटिंग एरिया, कवर ओव्हर प्लॅटफॉर्म, उद्वाहक, सरकते जिने आणि इतर प्रवासी सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
पहिल्या टप्यात ५० लोकल
या मार्गावर पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी तांत्रिक चाचण्या सुरू आहेत. अंतिम मान्यता मिळताच या मार्गावर पहिल्या टप्प्यात ५० लोकल धावणार आहेत. या सर्व लोकल १२ डब्यांच्या साधारण लोकल असणार आहेत. १५ डब्यांच्या गाड्या आणि एसी लोकलचा विचार दुसऱ्या टप्यात केला जाणार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्जत प्रवाशांचा ३० मी. वेळ वाचणार...
या मार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कर्जत यांच्यातील प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे. शिवाय या कपातीमुळे इतर स्थानकांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. कर्जत, भिवपुरी, नेरळ आणि खोपोली येथील हजारो प्रवाशांना प्रवास सुखकर होणार आहे.