स्वप्निल कुलकर्णी
मुंबई: टाकेचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही, असे म्हटले जाते. याच म्हणीची प्रचिती पंढरपुरातील अनेक दगडी मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये पाहायला मिळते. मूर्ती बनविणारे व्यावसायिक आषाढी वारीच्या चार-पाच महिने आधीपासून तयारी करतात.
आषाढी वारीत येणारे भाविक विठ्ठल-रुक्मिणी आणि विविध संतांच्या मूर्ती आपल्या गावात घेऊन जातात. आषाढी यात्रा काळात १२ ते १५ कोटींची उलाढाल होत असल्याचे मूर्तिकार सांगतात.
पंढरपूर परिसरातील १५ ते २० कारखान्यांमध्ये या दगडी मूर्ती बनविण्याचे काम बाराही महिने सुरू असते. बिहार आणि नेपाळमधून दगड मागवला जातो. यासाठी विशिष्ठ प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात येतो. बहुतांश मूर्ती या शाळीग्राम दगड, कृष्णशिला, काळा पाषाण अशा प्रकारच्या दगडांच्यापासून विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांच्या मूर्ती बनविल्या जातात.
कृष्णशिला शाळीग्राम दगड कर्नाटकमधील बागलकोट येथून येतो. गेल्या काही वर्षांपासून संतांच्या मूर्ती संगमरवरी दगडात बनविण्याची प्रथा सुरू झाली आहे. काळा मार्बल, पांढरा मार्बल तसेच देवतांच्या मूर्तींसाठी संगमरवर दगड राजस्थान येथून मागवले जातात. मूर्तीच्या आकारावरून त्याचे दर ठरले जातात.
एकदा मूर्ती तयार झाली की त्यावर फिनिशिंगसाठी खूप काम करावे लागते. या मूर्तींना ग्रॅण्डरने मूळ दगड कट करून पॉलिश पेपरच्या साहाय्याने घासून सुबकपणा आणि अचूकता साधली जाते. मूर्तीच्या आकारावर किमत ठरते. फायबर मूर्तीचे व्यावसायिक भागवत बडवे-महाजन यांनी सांगितले की, फायबर विठ्ठल मूर्तींना प्रचंड मागणी आहे.
या मूर्ती वजनाने हलक्या, टिकाऊ, न तुटणाऱ्या आणि पाण्याने धुण्यायोग्य असतात. या मूर्ती ३ इंचापासून सहा फुटांपर्यंत मिळतात. सर्वसामान्य वारकऱ्यांना परवडणाऱ्या या मूर्ती आहेत. फायबर केमिकल मूर्तीच्या साच्यात ओतून मूर्ती तयार केली जाते. त्यानंतर ती वाळवली जाते.
मूर्ती वाळल्यानंतर फिनिशिंग आणि टचअप केले जाते. त्यानंतर रंगकाम होते. पंढरपूरमध्ये ४ ते ५ कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यात १२-१५ कामगार असतात. आषाढीच्या एक महिनाआधीपासून मूर्ती बनवण्याची तयारी केली जाते. रोज किमान ३०० मूर्ती प्रत्येक कारखान्यात तयार होत असतात.
आमचा हा पारंपरिक व्यवसाय असून, ही आमची तिसरी पिढी व्यवसायात आहे. आषाढी वारीत सर्वात जास्त विठ्ठल आणि रुक्मिणी, नंदी, महादेव, गणपती, संत ज्ञानेश्वर या मूर्तींना मागणी असते. तसेच संत तुकाराम, गोरा कुंभार यांच्या मूर्तीदेखील भाविक खरेदी करतात. काळ्या आणि पांढऱ्या मार्बलमध्ये बनलेल्या मूर्तींना मागणी आहे. या मूर्तींची किंमत त्यांच्या आकारावर ठरवली जाते. कारखान्यत १२ कामगार आणि बाहेर ३० कामगार आहेत. वारीच्या आधी तीन महिने अनेक जण ऑर्डर्स देऊन जातात. त्यानंतर मूर्ती बनवण्याचे काम सुरू होते. तीन फुटांची एक मूर्ती ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत विकली जाते.- संजय पालकर, मूर्तिकार, श्रीराम मूर्ती भंडार आणि श्री व्यंकटेश मूर्ती कला केंद्र