Ganesh Mandal: गणेशोत्सव मंडळांना हवीय ट्रॉली ठेवण्यासाठी जागा; नगरसेवक महापालिकेत करणार ठराव

आयुक्त काय निर्णय घेणार याकडे मंडळाचे लक्ष लागले आहे.
Ganesh Mandal
Ganesh MandalPudhari
Published on
Updated on

मुंबई: गणेशोत्सव संपल्यानंतर मोठमोठ्या गणेशमूर्तीच्या ट्रॉली ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मंडळांनी केली आहे. यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई महापालिका सभागृहात जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव करून, तो ठराव पालिका आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे आयुक्त काय निर्णय घेणार याकडे मंडळाचे लक्ष लागले आहे.

मुंबई शहरातील गणेशोत्सव उंच मूर्तींसाठी ओळखला जातो. उत्सवाच्या काळात उंच मूर्तींची तर स्पर्धा लागलेली असते. कुणी १० फूट, तर कोणी ३५ फूटपर्यंत गणेशमूर्ती घडवतो. ही मूर्ती घडवण्यासाठी मोठ्या ट्रॉलीची आवश्यकता लागते.

Ganesh Mandal
Aciloc 150 Plus FDA Recall: एफडीएची २.४५ कोटींच्या ॲसिलॉक प्लस साठ्यावर कारवाई

त्यानुसार मंडळ मूर्तिकरांना हव्यात अशा ट्रॉली बनवून घेतात. मात्र गणेशोत्सव संपल्यानंतर या ट्रॉली ठेवायच्या कुठे, असा प्रश्न मंडळांना पडतो. जागा उपलब्ध नसल्यामुळे या ट्रॉली जेथे उत्सव साजरा करतो तेथेच रस्त्याच्या कडेला ठेवण्यात येतात.

त्यामुळे रस्त्यावर मोठा अडथळा निर्माण होतो, तर दुसरीकडे पावसाळ्यात ट्रॉली गंजून जातात. त्यामुळे दरवर्षी ट्रॉली दुरुस्तीसाठी मंडळांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे ट्रॉली ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळाकडून करण्यात आली होती.

मंडळाच्या मागणीचा विचार करून नगरसेवक अजय पाटील यांनी मुंबई महानगरपालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

या प्रस्तावात शहरातील उड्डाणपुलाखालील जागा ट्रॉलीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Ganesh Mandal
NESCO Case: नेस्को ड्रग प्रकरणात १४ वा आरोपी अटकेत

या मागणीचा प्रस्ताव जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या महापालिका सभेमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो ठराव महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी व पुढील अंमलबजावणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे जागा उपलब्ध करून देणार की नाही हे पालिका प्रशासनाच्या पातळीवर ठरवले जाणार आहे.

मोकळी जागा उपलब्ध करून देणे अशक्य

मुंबईत फारशी मोकळी जागा उरलेली नाही. शहरातील सार्वजनिक गणेश मूर्तींची संख्या दहा ते अकरा हजारांपेक्षा जास्त आहे. यात मोठ्या मूर्तींची संख्या अडीच ते तीन हजारांच्या घरात आहे. अशा मूर्तींच्या मोठ्या ट्रॉल्या ठेवण्यासाठी तेवढीच पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.

उड्डाणपुलाखाली तेवढी मोठी जागा उपलब्ध नाही. तरीसुद्धा नगरसेवकांच्या ठरावावर अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news