मुंबई : पालघर येथे 2020 मध्ये झालेल्या साधूंच्या हत्येप्रकरणी भाजपने ज्यांच्यावर आरोप केले होते, त्या काशिनाथ चौधरी यांच्या भाजपमधील प्रवेशाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी घाईघाइने स्थगिती दिली. विरोधकांसह हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या तीव्र टीकेनंतर भाजपला हा निर्णय घ्यावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डहाणू तालुकाध्यक्ष काशिनाथ चौधरी यांनी 16 नोव्हेंबर रोजी डहाणू येथे आयोजित जाहीर सभेत आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सोहळ्याला पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, या पक्षप्रवेशानंतर काही तासांतच राज्यभरातून टीकेची झोड उठली.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, प्रकरणाची संवेदनशीलता आणि जनभावना लक्षात घेऊन काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाने तत्काळ स्थगिती दिली आहे. पालघर जिल्हाध्यक्षांना याबाबतचे लेखी पत्रही पाठवण्यात आले आहे.
विरोधकांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून या प्रकरणी नाराजीचा सूर आळविल्यानंतर भाजपकडून सारवासारव सुरू झाली. याप्रकरणी नवनाथ बन यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सीबीआय आणि सीआयडीच्या तपासात चौधरी यांचे नाव कोठेही आरोपी म्हणून नाही. प्राथमिक माहिती अहवालात किंवा आरोपपत्रातही त्यांचा उल्लेख नाही. पूर्ण माहिती घेऊनच स्थानिक पातळीवर त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर झालेल्या चर्चेनंतर पक्षाने संवेदनशीलतेचा विचार करून माघार घेतली.
याच पत्रकार परिषदेत बन यांनी विरोधकांवरही टीका केली. रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, कालपर्यंत राष्ट्रवादीत असताना चौधरी रोहित पवारांना चांगले वाटत होते. आता भाजपमधे आले की एका रात्रीत दोषी कसे झाले? हा दुटप्पीपणा जनता सहन करणार नाही.
निर्णय स्थानिक पातळीवर ः मुख्यमंत्री
हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला होता. मी या प्रकरणाची माहिती घेतली. जे आरोप करीत आहेत, ती व्यक्ती कालपर्यंत त्यांच्या सोबत होती, तेव्हापर्यंत चांगली होती. आज आमच्याकडे आली, तर वाईट झाली. या प्रकरणाची पूर्ण चौकशी झालेली आहे आणि त्यात काय समोर आले, हे सर्वांना माहिती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे नव्या भाजपचे तंत्र दिसते ः रोहित पवार
दोन वर्षांपूर्वी आपण आरोप करून राळ उठवली आणि ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनाच नेहमीप्रमाणे भाजपात घेतले. आमच्याकडे असले की आरोप, तुमच्याकडे येताच पवित्र होतात. सलीम कुत्ता, इकबाल मिरची, आदर्श घोटाळा अशी असंख्य प्रकरणे आहेत, ज्यांचे डाग भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले आहेत. असो, आधी आरोप करायचे आणि नंतर पक्षात प्रवेश द्यायचा, आपली ही मोडस ऑपरेंडी बघता, “ना नीती ना मत्ता... प्रिय केवळ सत्ता” हेच आपल्या नव्या भाजपचे तंत्र दिसते, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला.