चंदन शिरवाळे
मुंबई: महाराष्ट्राची ओळख असलेल्या पैठणीसह करवत काठी, हिमरू, घोंगडी या पारंपरिक वस्त्रांना बनावट उत्पादनांपासून रोखण्यासाठी आता या वस्त्रांना क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. सध्याच्या कागदी आणि हस्तलिखित नोंदी असल्यामुळे गैरप्रकार घडत आहेत. तसेच, कार्यक्षमतेचा अभाव आणि माहितीची पडताळणी करताना अडचणी निर्माण होत आहेत.
आता क्यूआर कोड स्कॅन करताच कच्च्या मालाची खरेदी, रंगकाम, साडी कोणी विणली आणि निर्मितीची प्रक्रिया याची ग्राहकाला माहिती मिळणार आहे.
प्रत्येक टप्पा संबंधित कारागिराच्या डिजिटल ओळखीशी जोडला जाणार आहे. त्यामुळे वस्त्राचा संपूर्ण उत्पादन प्रवास ग्राहकाला पाहता येईल, असा दावा राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी केला आहे.
खरी पैठणी ओळखा
प्रस्तावित व्यवस्थेत प्रत्येक साडीला डिजिटल प्रमाणपत्रासह क्यूआर कोड दिला जाणार आहे. पॅकिंगपर्यंतची संपूर्ण डिजिटल माहिती आता ग्राहक पाहू शकेल. डिजिटल स्वाक्षरी आणि वेळेच्या नोंदीसह प्रत्येक क्रम सुरक्षित केला जाणार आहे. त्यात फेरफार करणे कठीण होणार आहे.
साडी तयार करताना कारागिराने दिलेल्या योगदानाची कायमस्वरूपी डिजिटल नोंद उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे सरकारी योजना, विविध लाभ तसेच अधिकृत मान्यता मिळवताना त्याच्या कामाचा पुरावा उपलब्ध होऊ शकणार आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १०० हून अधिक कारागिरांना डिजिटल व्यवस्थेशी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
त्याचबरोबर दोन हजार पैठणी आणि करवत काठी साड्यांची डिजिटल नोंद तयार केली जाणार आहे. हंस, मोर आणि पोपट यासारख्या पारंपरिक नक्षींचीही ब्लॉकचेनवर आधारित माहिती नोंदवण्याचा प्रस्ताव आहे.
अस्सल पैठणीला योग्य किंमत
पैठणीसारख्या महागड्या पारंपरिक वस्त्राच्या अस्सलता ओळखण्यात ग्राहकांचा वेळ जातो. साडी खरेदी केली तरी ग्राहकांच्या मनात शंका असते. आता डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खरेदीपूर्वीच ग्राहकाला साडीची अस्सलता तपासता येणार आहे. यामुळे बनावट उत्पादनांना आळा बसण्यासोबतच खऱ्याखुऱ्या हातमाग उत्पादनाला योग्य आणि अधिक किंमत मिळण्यास मदत होईल.
कारागीर ते ग्राहकापर्यंत सगळे आता एकाच डिजिटल मंचावर
या व्यवस्थेत कारागीर, सहकारी संस्था, सरकारी विभाग आणि ग्राहक यांना एकाच डिजिटल मंचावर जोडण्याचा प्रस्ताव आहे. प्रशासनाला उत्पादन प्रक्रियेवर देखरेख ठेवता येईल तर ग्राहकाला साडीच्या निर्मितीशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.
त्यामुळे पारंपरिक वस्त्रांच्या बाजारात पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल. कारागिराच्या श्रमाला डिजिटल ओळख आणि अस्सल उत्पादनाला विश्वासाची हमी हे या संपूर्ण उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे वस्त्रोद्योगमंत्री सावकारे यांनी स्पष्ट केले.