

मुंबई: विधानपरिषदेच्या नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर तर पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी येत्या २३ तारखेला निवडणूक होत असून शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) बंडखोर उमेदवार भैया माने आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली.
त्यामुळे आता या दोन्ही मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत रंगणार आहे. मात्र, महाविकास आघाडीतील मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पाचही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.
या मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान, माजी आमदार दत्ता सावंत यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून तिकीट न मिळाल्याने मंगेश चिवटे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला होता. तसेच, निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, शुक्रवारी चिवटे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला.
त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात आता महायुतीचे कौस्तुभ गावडे विरुद्ध महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर अशी दुरंगी लढत होत आहे. मात्र, या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे माजी ओएसडी सचिन सानप यांनी बंडखोरी केली आहे. त्यांचा अर्ज कायम आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून आता प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण ५४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ४१ उमेदवार मैदानात आहेत.
या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपचे एम. के. देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता.
देशमुख यांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी भाजप नेत्यांकडे केली होती. मात्र, त्यात यश न आल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासात माघार घेतली. त्यामुळे आता महायुतीकडून सतीश चव्हाण हेच प्रमुख उमेदवार मैदानात आहेत.
‘मविआ’तर्फे ‘उबाठा’, राष्ट्रवादीकडूनही अर्ज
दरम्यान, महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद मात्र दूर होऊ शकले नाहीत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्याचे सांगत दिलीप घुगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनी निवडणुकीसाठी अर्जही दाखल केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी माघार न घेतल्याने आता दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम राहिले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे.
भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याविरोधात भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी बंड केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अभिजित वंजारी यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश कराळे (कराळे गुरुजी) यांनी बंड केले आहे. त्यामुळे या ठिकाणाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
अमरावती शिक्षकमध्ये तिरंगी लढत
अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाकडून याच मतदारसंघामधून दत्तात्रय लहाने हे निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघातून पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज चव्हाण, रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती रेवने आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेचे नितीन आगे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे, महायुतीकडून शिवसेनेचीच उमेदवारी अंतिम झाली आहे.