Padgha Water Crisis Bhiwandi: पडघ्यात पाणीटंचाई तीव्र; नव्या जलयोजनेचा बोजवारा, ऐतिहासिक विहिरी कचऱ्याखाली Pudhari
मुंबई

Padgha Water Crisis Bhiwandi: पडघ्यात पाणीटंचाई तीव्र; नव्या जलयोजनेचा बोजवारा, ऐतिहासिक विहिरी कचऱ्याखाली

ग्रामसभेत नागरिक आक्रमक; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाणी सत्याग्रहाची साक्ष देणारी ‘सतीची विहीर’ही दुर्लक्षित

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : राकेश म्हात्रे

भिवंडी तालुक्यातील पडघा गावातील पाणी प्रश्न नवीन जल योजना मृतावस्थेत गेल्यामुळे येथील विहिरी देखील अखेरच्या घटका मोजत असलेल्या दिसून येत आहेत. दिवसेंदिवस बिकट होत चाललेला पाणी प्रश्न पाहता नैसर्गिक स्रोत असलेल्या विहिरी देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पाहावयास मिळत आहेत.

दरम्यान पडघा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक अजूनही शुद्ध व अपुऱ्या पाण्यासाठी झुंज देत असून नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत यावर नागरिक आक्रमक झालेले दिसले. पडघा ग्रामपंचायत येथे नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. पडघ्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट झाला असून आठवड्यातून एक किंवा दोन वेळा काही ठिकाणी पाणी सोडण्यात येते व तेही गढूळ स्वरूपाचे असून पिण्याच्या पाण्यासाठी आजही शंभर वर्षानंतर विकतच्या पाण्यावर नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. यापूर्वी दोन वेळा शासनाकडून पाणी योजना पडद्या गावासाठी मंजूर करण्यात आली होती; परंतु ही योजना बासनात गुंडाळून ठेवावी लागली. यात भर म्हणून पडघ्या गावातील जुनी सतीची विहीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाणी सत्याग्रहाची साक्ष म्हणून पडघ्यात दिसत होती. ती सुद्धा दगड, माती, प्लास्टिक बाटल्या, कचऱ्याने भरलेली दिसत असून इतर काही विहिरींची देखील अशीच अवस्था झालेली दिसून येत आहे.

पडघ्यामध्ये दर रविवारी आठवडा बाजार भरला जातो. आजूबाजूच्या खेडे गावातील अनेक नागरिक आठवडा बाजार खरेदीसाठी व अनेक व्यापारी आपला माल विकण्यासाठी बाजारात येत असतात. पूर्वी फक्त सकाळी चालणारा हा बाजार आता काही वर्षांपासून पूर्ण दिवसभर भरलेला दिसून येतो. याच विहिरी तेव्हा नागरिकांचे तहान भागवण्याचे काम करीत होते; परंतु विहिरींची अवस्था आता इतकी दयनीय झाले आहे की, काही विहिरी पूर्णपणे प्लास्टिक कचरा दगड विटांनी भरून गेलेल्या असून याबाबत मागील वर्षी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव यांनी मुंबई पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचलनालय, ठाणे जिल्हाधिकारी, भिवंडी प्रांत ऑफिस, तहसीलदार यांच्याकडे याबाबत तक्रारी देखील केल्या होत्या.

विहिरी साफ करण्याचे काम सुरू आहे. लवकरच गावातील सर्व विहिरी साफ करून नागरिकांसाठी पाणी वापरण्यायोग्य करण्यासाठी प्रयत्न करू.
भास्कर घुडे ग्रामपंचायत अधिकारी, पडघा

भविष्यात पाणीप्रश्न बिकट

पडघे गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद साने यांनी देखील पडघा ग्रामपंचायत येथे विहिरी साफ करण्यासंदर्भात तक्रारी अर्ज केलेले आहेत. परंतु पडघा ग्रामपंचायत- कडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने भविष्यात पाण्याचा प्रश्न अजूनच बिकट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT