घाटकोपर: घाटकोपर -अंधेरी लिंक रोडवरील जागृती नगर ते साकीनाका जंक्शन दरम्यान असलेल्या दुभाजकावर एमएमआरडीएकडून सुशोभीकरणांतर्गत विविध प्रकारची शोभेची झाडे लावण्यात आली होती.
या झाडांची पूर्ण क्षमतेने वाढही झाली. त्याकरिता या झाडांना वेळोवेळी पाणी देण्याचे काम महापालिकेतर्फे करण्यात येत होते.मात्र सध्या अनेक दिवसांपासून या झाडांना पाणी न मिळाल्याने पाण्याअभावी ही झाडे सुकली असून अनेक झाडे पूर्णपणे जळून गेल्याचे चित्र आहे.
अंधेरी -घाटकोपर मेट्रोच्या कामादरम्यान या रस्त्यावरील दुभाजकाचे बांधकाम करून विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली. अनेक ठिकाणी लोखंडी जाळीही बसवण्यात आली.
रात्रीच्या वेळी समोरील वाहनाची लाईट चालकाच्या डोळ्यावर पडू नये, हवामानाचे संतुलन राखले जावे आणि त्या माध्यमातून शहराचे सौंदर्यीकरण व्हावे या उद्देशाने सदर दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या झाडांकडे महापालिकेने पूर्णतः दुर्लक्षकेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे सध्या या झाडांची अवस्था बिकट झाली असून अनेक झाडे सुकून गेली तर अनेक झाडे पूर्णपणे होरपळून गेल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईचे तापमान आणि उष्णतेचा विचार करता या काळात झाडांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. मात्र महानगरपालिकेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने गेले कित्येक दिवस या झाडांना पाणी मिळाले नाही.
त्यामुळे या झाडांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या झाडांना वेळेवर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे.