नरेश कदम
मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला,तर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला देण्याचे महाआघाडीत यापूर्वीच ठरले असताना, याच्या बरोबर उलटा प्रस्ताव सत्तारूढ महायुतीने विरोधकांना दिला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला तर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव असून हा प्रस्ताव काँग्रेस मान्य करणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधानसभेत महाआघाडीत उद्धव ठाकरे गटाकडे सर्वात जास्त २० आमदार आहेत, त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे देण्याबाबत महाविकास आघाडीत यापूर्वीच एकमत झाले आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्रही विधानसभा अध्यक्षांकडे यापूर्वीच देण्यात आले आहे.
तर विधान परिषदेत विरोधी बाकावर काँग्रेसचे आमदार महाआघाडीत जास्त असल्याने या सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्यात येईल, असे महाआघाडीत ठरले आहे. या पदासाठी सतेज पाटील यांचे नाव काँग्रेसने निश्चित केले आहे, परंतु सत्तारूढ पक्षाच्या नेतृत्वाला हे मान्य नाही.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला,तर विधानसभेचे काँग्रेसला देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे. यात सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद न देण्याचा प्रयत्न सत्तारूढ पक्षाकडून केला जात आहे. सत्तारूढ पक्षाला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे विदर्भातील काँग्रेसच्या एका नेत्याला देण्यासाठी सत्तारूढ पक्षाची ही खेळी आहे.
विदर्भातील काँग्रेसचे काही नेते हे सत्तारूढ भाजप नेत्यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे ही नवी खेळी आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना देण्याची खेळी आहे.
यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी ही व्यूहरचना आखली जात असल्याचे बोलले जात आहे. सत्तारूढ पक्षाकडून असा प्रस्ताव एका आमदारामार्फत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
अदला-बदलीला काँग्रेसचा विरोध
विरोधी पक्षनेतेपदाच्या अदलाबदलीबाबत काँग्रेसचा विरोध असेल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही तर भास्कर जाधव हेही नाराज होतील. त्यामुळे महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपदावरून भांडणे लावण्यासाठी ही खेळी कारणीभूत ठरेल असे दिसते.