online Fraud of an  woman
महिलेची फसवणुक Pudhari File Photo
मुंबई

मालिकेत काम देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणुक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : स्टार प्लसच्या एका मालिकेत काम देण्याचा बहाणा करुन एका तरुणाची ऑनलाईन फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुण हा अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहत असून तो स्ट्रग्लर ऍक्टर आहे. हिंदी मालिकासह चित्रपटात काम मिळविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. तो विविध ऑडिशन व्हॉटअप ग्रुपचा सभासद आहे. काही दिवसांपूर्वी त्याला एका व्हॉटअप ग्रुपमधून कॉल आला होता. या व्यक्तीने तो अभयकुमार असून कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगितले. त्याने त्याला ऑडिशन व्हिडीओ पाठविण्यास सांगितले होते.

काही दिवसांनी त्याने त्याला फोन करुन त्याची स्टार प्लसच्या एका मालिकेत निवड झाल्याचे सांगितले. त्याला रजिस्ट्रेशन फीसह इतर कायदेशीर कामासाठी पैसे भरण्यास सांगून त्याने स्नेहा सिंग या तरुणीचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याने एका बँक खात्यात सुमारे सव्वाचार लाख रुपये जमा केले होते. ही माहिती नंतर त्याने अभयकुमारसह स्नेहाला दिली होती. मात्र दोन आठवडे उलटूनही त्याने त्याला कॉल केला नाही. त्याने संपर्क साधल्यानंतर ते दोघेही त्याला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्याला पैसे पाठविल्यानंतर त्याच्यासोबत करार होईल आणि नंतर चेक पाठविला जाईल असे सांगितले होते, मात्र त्यांनी त्याच्यासोबत कुठलाही करार न करता त्याला चेक पाठविले नव्हते. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्याने वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अभयकुमार आणि स्नेहा शर्मा नाव सांगणार्‍या दोन्ही सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

SCROLL FOR NEXT