मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्जाच्या नावाने फ्लॅटची परस्पर विक्री करुन एका वयोवृद्ध महिलेची नऊजणांच्या टोळीने फसवणुक केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी नऊ आरोपीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये धवल भरत सिरीया, रेखा भरत सिरीया, साहिराबानू जुल्फीकार, रफिक मोहम्मद सय्यद, एस. एस टेडर्संच्या समीना, मोहम्मद सिद्धीकी रेहमान, हेमंत वसंतराय मेहता, अमीत यादव आणि वसंतराय मेहता यांचा समावेश आहे.
सर्व आरोपी पळून गेल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध घेत आहे. ७१ वर्षांच्या वयोवृद्ध तक्रारदार महिला बोरिवली परिसरात राहते. दोन वर्षापूर्वी तिच्या सूनेला पाच लाख रुपयांचे पर्सनल लोनची आवश्यकता होती. याच दरम्यान एका मैत्रिणीच्या मध्यस्थीने तिची सलीम ऊर्फ मोहम्मद सादिकुरशी ओळख झाली होती. तिने तिला पाच लाख रुपयांचे पर्सनल लोन दिले होते. त्यासाठी त्याने तारण म्हणून तक्रारदार महिलेचा फ्लॅट बँकेत तारण म्हणून ठेवले होते. नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान तिने कर्जाचे नियमित हप्ते भरले होते. तिला तिच्या बँकेचे पासबुक मिळाले नव्हते.
त्यामुळे तिने बँकेत जाऊन पासबुक घेतले असता तिला तिच्या बँक खात्यातून सुमारे ८५ लाखांचा व्यवहार झाल्याचे दिसून आले. ही रक्कम तिच्या परिचित नसलेल्या धवल सिरीया, रेखा सिरीया, साहिराबानू, रफिक सय्यद, समीना, मोहम्मद सिद्धीकी, हेमंत मेहता, अमीत आणि वसंतराय मेहता यांच्या खात्यात ट्रान्स्फर झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची वयोवृद्ध महिलेच्या मुलाने शहानिशा केली असता त्याला संबंधित आरोपींनी आपसांत संगनमत करुन कर्ज देतो असे सांगून फ्लॅटचे कागदपत्रे घेतले. त्यानंतर या फ्लॅटची हेमंत मेहता याला सव्वाकोटींना विक्री केली होती. त्यापैकी ८५ लाखांचे पेमेंट त्यांना मिळाले होते. हा संपूर्ण व्यवहार वयोवृद्ध महिलेला अंधारात ठेवून करुन तिची फसवणुक करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता. हा प्रकार उघड होताच तिने बोरिवली पोलिसात संबंधित नऊ आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.